मान्सून बाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट
पुणे (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढल्याचे चित्र आहे तसेच अधून-मधुन काही भागात अवकाळी पाऊसही सुरु आहे. धरणांच्या पाण्याची पातळी खालावली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरु आहे.
गावागावांमध्ये पाण्यासाठी टँकरची सोय करण्यात आली आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. मान्सून कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसापूर्वी हवामान विभागाने India Meteorological Department (IMD) मान्सूनबाबत एक अहवाल देण्यात आला होता. या अहवालानुसार, देशात एल निनो प्रणाली कमकुवत होत असून ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे, यामुळे यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल आहे. मान्सून वेळेपूर्वी भारतात येऊ शकतो. तसेच ला नीना सोबतच, हिंद महासागर द्विध्रुव (IOD) परिस्थिती देखील यावर्षी चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल होत आहे, हे मान्सूनसाठी सकारात्मक संकेत आहेत असे हवामान विभागाने म्हंटले आहे. नैऋत्य मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये पोहोचणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच यंदा भारतात आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये मान्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. तर राज्यात मान्सून १० जूनपर्यंत दाखल होणार आहे. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून १० ते ११ जून रोजी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.