रावेर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
एका तीन वर्षीय मुलीचा तिच्या सावत्र बापाने गळा आवळून खून केल्याची घटना रावेर शहरात घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या खून प्रकरणी मुलीची सख्खी आई व सावत्र बापाला पोलिसांनी अटक केली आहे.
खूनामागील कारण समजू शकले नसून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. माधुरी घेटे व अजय घेटे अशी अटक केलेल्या मुलीच्या आई वडिलांचे नाव आहे. खूनाचे कारण पोलीस तपासात निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
बेलसवाडी ता मुक्ताईनगर येथील रहिवासी माधुरीचा वारोली येथील भारत मसाने याच्याशी 2017 मध्ये विवाह झाला होता. माधुरीला पहिल्या पतीपासून पाच वर्षाचा मुलगा पियुष व तीन वर्षाची मुलगी आकांक्षा आहे. मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलासह बेलासवाडी येथे राहत होती. त्यानंतर माधुरीने रावेर येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसापूर्वी लग्न केले होते . तेव्हापासून ही दोन्ही मुले रावेर येथे अजयकडे राहत होती. 31 मे रोजी अजयने तीन वर्षाची सावत्र मुलगी आकांक्षा हिला दांडक्याने मारले तसेच गळा आवळल्याने ती मयत झाली.
ही घटना अजयची पत्नी माधुरीस माहित असताना तिने पुरावा नष्ट करण्याच्या व मृतदेहची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह पतीपत्नीने माहेरी बेलसवाडी येथे नेला. मात्र यावेळी माधुरीचा पहिला पती व मुलीचा सख्खा बाप भारत म्हसाने याला समजल्यावर त्याने बेलसवाडी गाठले. त्याने मुलगा पियुष याला विचारणा केल्यावर दुसऱ्या पप्पाने मारले असे सांगितले. म्हसाने याला मुलीच्या गळ्याजवळ निशाण दिसून आल्याने त्याने अंतुर्ली पोलीस चौकीत मुलीला नेले. पोलिसांनी तेथून मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे तपासणी केली असता मुलीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मुलीचे शवविच्छेदन केल्यावर गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने रावेर पोलिसांनी मुलीची सख्खी आई व सावत्र बाप या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान खूनाचे कारण समजू शकले नसून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ तपास करीत आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.