वाशीम : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. वाशिमच्या समृद्धी महामार्गावर नागपूर लेनवर उभ्या असलेल्या ट्रकच्या मागच्या बाजूला भरधाव कारने धडक दिली आहे.
हा अपघात इतका भयंकर होता की कारचा पुढचा भाग ट्रकच्या मागच्या बाजूला घुसला आहे. कारच्या मागच्या बाजूलाही तडे गेले आहेत.
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना मालेगांवच्या रिधोरा इंटरचेंजजवळ घडल्याची माहिती मिळाली आहे. अपघातग्रस्त कारने उभ्या ट्रकच्या मागील बाजूने धडक दिल्यानं अर्ध्याहून अधिक कारचा पुढील भाग ट्रक खाली घुसला.
या कार मधील तीन मृतकांपैकी कार मधील मागील मृतदेह काढून तो मालेगांव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. कारच्या पुढील सीटवर बसलेला चालक आणि एक जणाचा मृतदेह कारमध्येच फसलेला असून तो JCB च्या साह्याने काढण्यात येणार आहे. कारची अवस्था इतकी भीषण आहे की मृतदेह कापून काढण्याची वेळ येते का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अपघातग्रस्त कार ही अमरावती जिल्ह्यातील असण्याची शक्यता असून मृतकांची अद्याप ओळख पटली नाही .अपघातग्रस्त कार मधून तिघे जण प्रवास करत होते.अपघाता नंतर हायवे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचं कारण अद्याप समजू शकलं नाही, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.