मुंबई : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. 2024 च्या लोकसभेत महाराष्ट्रातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं पाहायला मिळालं.
तर, निवडणूक निकालांत महायुतीचा पुरता धुव्वा उडाला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा लोकसभेत भोपळा फुटला असला तरी केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटानं पुन्हा एकदा कंबर कसली असून आज मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. पण, अजित पवारांच्या या बैठकीला काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक आज मूंबईत होणार आहे. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे. महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता आहे. 7 आणि 8 तारखेला अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीला जाणार असून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.
दादांच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर, घरवापसीची शक्यता?
एकीकडे अजित पवार एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं ते नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंशी संवाद साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीच्या जास्त जागा निवडून येतील, असा विश्वास असताना त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही आणि महाविकास आघाडीनं बाजी मारली. त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांमध्येही चलबिचल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आमदारांकडून सुप्रिया सुळेंना संपर्क करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या ‘पॉवर’ फॅक्टरचा डंका
राष्ट्रवादी फुटल्यानंतर 40 हून अधिक आमदार हे अजित पवारांसोबत गेले होते. असं असलं तरी लोकसभा निकाल लागल्यानंतर शरद पवारांना मोठं यश मिळालं. शरद पवारांनी 10 पैकी 8 खासदार हे निवडून आणले. तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला. अजित पवार हे सुनेत्रा पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये आता चलबिचल सुरू असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री शिंदे, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, तटकरेंची मोदींसोबत चर्चा
एनडीएची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. त्यावेळचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील नेत्यांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी मोदींनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटीत राज्यांतील पराभवाची कारणं जाणून घेतली. राज्यांतील मराठा आंदोलन, उमेदवार वाटपात झालेला घोळ, विदर्भातील संत्रा, धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ही प्रमुख कारणं असल्याची माहिती नेत्यांनी दिली आहे. राज्यांतील अल्पसंख्याक, दलित, धनगर आणि मराठा समाजाचा महाविकास आघाडीकडे वाढलेला ओढा अडचण ठरत असल्याची देखील माहिती नेत्यांनी मोदींना दिली. त्यासोबतच विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्देश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.