मुंबई : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
सलग तिस-यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद मोदींनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. सोबत 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभाराचे राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री अशी एकूण 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
महाराष्ट्राच्या वाट्याला दोन कॅबिनेट तर चार राज्यमंत्रिपद मिळाली आहेत. सात खासदार असूनही शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले नाहीच. तर एकही खासदार नसताना आठवलेंना पुन्हा राज्यमंत्रीपद मिळाले आहे. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदाराला मात्र, मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलीय. मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर काही विद्यमान मंत्र्यांचे पत्ते कट करण्यात आले. महाराष्ट्रातून मोदी सरकारमध्ये 6 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, चर्चा होतीय ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा जिंकता आली. राष्ट्रवादीला 1 मंत्रीपद मिळेल, अशी आशा होती. मात्र मंत्रीमंडळात त्यांना स्थानच मिळालेलं नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी ऑफर देण्यात आली होती. मात्र, प्रफुल्ल पटेलांनी ती नाकारली आणि पुढील वेळेस मंत्रीपद दिलं तरी चालेलं असं सांगण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली.
कॅबिनेट मंत्री राहिल्यानं राज्यमंत्रीपद स्वीकारणं योग्य वाटलं नाही असं स्पष्टीकरण स्वत: प्रफुल्ल पटेलांनी दिलंय. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणालेत, राष्ट्रवादीत सर्व आलबेल असल्याचंही पटेलांनी स्पष्ट केलं. तर केंद्रीय मंत्रीपदावर ठाम असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय.
या कारणामुळे मिळाले नाही राष्ट्रवादीला मंत्रीपद
एक खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादीला कॅबिनेट देणे अशक्य असल्याने मंत्रिमंडळातील सहभाग खोळंबला. एकिकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार असून देखील त्यांना केवळ 1 राज्यमंत्रीपद मिळत असल्याने दुसरीकडे केवळ 1 खासदार असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद कस द्यायचा हा प्रश्न होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही इच्छुक नेते हे वरिष्ठ असल्याने राज्यमंत्रीपद देण्यात देखील महायुतीला अडचणी आल्या. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्रिमंडळात सहभाग नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळाल्यास घटक पक्ष नाराज होण्याची शक्यता कारण देशात 1 सदस्य निवडून आलेले 7 पक्ष आहेत.
रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल
रोहित पवारांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. अजित पवार गटाला मंत्रिपद मिळालं नसलं तरी ईडीच्या कारवाईतून त्यांना मुक्ती मिळाली. त्यामुळे अजित पवार गटाला व्यक्तिगत गिफ्ट मिळालंय. अजित पवार गट आणि शिंदेंना राज्याशी काही देणंघेणं नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी मंत्रिपदाची मागणी करत असून, अजित पवारांचा पक्ष येत्या काळात राहणार नाही. निवडणूक लढविण्यासाठी अजित पवार गटाकडे कमळ हाच पर्याय आहे. असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला. दरम्यान रोहित पवार सारख्या गल्लीतल्या नेत्यांनी प्रसिद्धीसाठी दिल्लीतल्या घडामोडी वर भाष्य करू नये असा फलटवार राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी म्हटलंय.