नागपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
नागपूर हिट अँड रन प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. ही हत्या संपत्तीच्या हव्यासापोटी नव्हे तर काळ्या जादूमुळं झाल्याचं समोर आलंय. उच्च शिक्षित कुटुंबात अंधश्रद्धेनं गाठलेला हा कळस चक्रावणारा आहे.
अत्यंत थंड डोक्याने हा कट तडीस नेल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
नागपूरच्या बालाजी नगर परिसरात अपघाताची घटना घडली होती. एका वाहनाच्या धडकेत पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा जागीच मृत्यू झाला होता. वरवर पाहाता अपघाताची घटना वाटत असली तरी हा खुनाचा प्रकार असल्याचं समोर आलं. एका सुनेनं 20 कोटींसाठी सासऱ्याचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. याप्रकरणी रोज नवे-नवे ट्विस्ट समोर येत आहेत. अर्चना पुट्टेवारच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.अतिशय प्लॅनिंगने केलेल्या या खूनामध्ये अनेक उच्चशिक्षित अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं समोर आलंय.
पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघात नव्हता तर तो घातपात असल्याचं उघड झालं आहे. पुट्टेवार यांची सून अर्चना पुट्टेवार ही या खुनाची मास्टरमाईंड आहे. अर्चना पार्लेवार-पुट्टेवार या गडचिरोली नगररचना विभागात सहाय्यक संचालकपदी आहेत. एका भ्रष्टाचार प्रकरणात त्यांची सुनावणीही सुरू आहे. तिनं अत्यंत थंड डोक्यानं 82 वर्षीय सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या खुनाचा कट रचला. अर्चनाने त्यांचा सरकारी अधिकारी असलेला भाऊ प्रशांत पार्लेवार याला हाताशी धरत संपूर्ण थंड डोक्यानं हत्या घडवून आणली. यात तिने ड्रायव्हर सार्थक आणि निरज निमजे यांना पैसे दिले आणि हत्या करण्याला सांगितलं.
हत्येची सुपारी देणाऱ्या सून अर्चना पुट्टेवार यांना सासरे पुरूषोत्तम काळ्या जादूचा वापर करतात असा संशय होता. पोलिसांच्या चौकशीत सूनेनं ही माहिती दिली. सासरे पुरूषोत्तम पुट्टेवार हे धार्मिक वृत्तीचे होते. ते जास्त पूजा अर्चा करायचे. ते जादूटोणाही करतात असा सूनेला संशय होता. त्यांच्यामुळेच आपल्या माहेरच्या कुटुंबातल्या काही जणांचा मृत्यू झाल्याचं अर्चना यांना वाटायचं. अर्चनाचा मोठा भाऊ प्रवीण पार्लेवर याचा 2007 मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. तर बहिणीचा मुंबईमध्ये असताना जळून मृत्यू झाला होता. बहिण-भावाचा हा मृत्यू काळ्या जादूने झाला, असा संशय सून अर्चना पट्टेवारला होता.
20 कोटींच्या संपत्तीसाठी आरोपी अर्चना पुट्टेवारनं सासरे पुरुषोत्तम यांचा कट करुन घातपात केल्याचं उघड झालं आहे. यासाठी आरोपींना तब्बल 1 कोटींची सुपारी देण्यात आली होती. त्यापैकी 17 लाख रुपये ऍडव्हान्स दिले होते. सोबतच दारु बारचं लायसन्स आणि बारसाठी जागाही देण्याचं आमिष दाखवलं होतं.
अपघाताचा बनाव करुन अर्चना पुट्टेवारनं सासऱ्याला संपवलं खरं, पण पोलिसांच्या नजरेतून त्यांची चलाखी काही सुटली नाही. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना गजाआड केलंय. पण, पांढऱ्या कॉलरच्या सुशिक्षीत लोकांनी काळ्या जादूच्या अंधश्रद्धेत केलेलं हत्येचं, हे काळं कृत्य सर्वांचंच डोकं चक्रावणारं आहे.