नाल्या तुडुंब भरल्या, सफाई कामगारांची संख्या अर्ध्यावर
जनविकास सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
मागील वर्षी चंद्रपूर शहरात पहिल्याच पावसामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती. वडगाव प्रभागातील नानाजी नगर, दत्तनगर, मित्र नगर, बापट नगर,स्नेह नगर, भावनाथ सोसायटी, अपेक्षा नगर, ओम भवन इत्यादी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. हजारो नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. संपुर्ण शहरात कमी जास्त प्रमाणात हीच परिस्थिती पहिल्या पावसाने निर्माण केली होती. मुळात पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई करणे, नाल्यांमध्ये साचलेला कचरा काढून नाल्यांचे प्रवाह मोकळे करणे अशी स्वच्छतेची महत्त्वपूर्ण कामे मागील वर्षी मनपाने केले नाही. मनपाच्या या चुकीमुळे कृत्रिम पुराचा फटका शहरातील नागरिकांना बसला, हजारो नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले असा आरोप मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.
यावर्षी सुद्धा संपूर्ण शहरातील नाल्यांमध्ये कचरा साचलेला आहे,नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत.त्यामुळे पहिल्याच पावसात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिली.या बाबत तातडीने उचित कार्यवाही करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विनय गौडा यांना पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने लेखी पत्र देऊन उचित कार्यवाही करण्याची मागणी केली. शिष्टमंडळामध्ये जनविकास सेनेचे सुभाष पाचभाई,मनिषा बोबडे,अक्षय येरगुडे,अमोल घोडमारे,स्नेहल चौथाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
बल्लारपूरचा वादग्रस्त कंत्राटदाराची नियुक्ती
मनपा आयुक्त बिपिन पालीवाल बल्लारपूर नगर पालिकेत मुख्याधिकारी असताना दीपक उत्तराधी या कंत्राटदाराकडे कचरा संकलनाचे काम होते. याच कंत्राटदाराला मागच्या वर्षी मनपाच्या नाली सफाईचे काम मिळाले.
तीन वर्षांपूर्वी मनपा मध्ये 300 च्या जवळपास कंत्राटी कामगार नाली सफाईचे काम करत होते. दिपक उत्तराधी यांनी ही संख्या 180 च्या जवळपास आणली. संपूर्ण शहरात एकूण 90 हजारच्या वर निवासी व व्यावसायिक मालमत्ता आहेत. यातील सांडपाणी तसेच पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची एकूण लांबी 1000 किलोमीटरच्या जवळपास आहे. स्वच्छतेच्या निकषानुसार सात दिवसातून एकदा प्रत्येक नालीची सफाई करणे आवश्यक आहे.नाली सफाईच्या कामाकरिता जवळपास 500 ते 600 कामगारांची गरज आहे.मात्र नविन कंत्राटदाराने केवळ 180 कामगारांची नियुक्ती केली. एवढ्या कामगारांमध्ये शहराची सफाई अशक्य असल्याने कामाचा ताण वाढला.स्वच्छता विभागाचे निरीक्षक,सफाई दरोगा,अधिकारी सर्वच हतबल झालेले आहेत.
नवीन कंत्राटदारासोबत झालेल्या करारानुसार पंधरा दिवसातून प्रत्येक नालीची सफाई करून जिपिएस फोटो अपलोड करणे गरजेचे आहे.अन्यथा दंड आकारण्याची तरतूद करारात आहे.शहरात चार-चार, सहा-सहा महिने नाली सफाई होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. मात्र आजपर्यंत कंत्राटदाराला दंड आकारलेला नाही. कामगार कमी केल्याने कंत्राटदार व आयुक्तांची मजा असून नागरिकांना सजा मिळत असल्याची टिप्पणी देशमुख यांनी केली.