नागपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणी दिवसागणित एका पाठोपाठ एक असे धक्कादायक खुलासे होत आहेत. नागपूच्या अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत बालाजी नगर परिसरात 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना 22 मे रोजी एका भरधाव कारनं धडक दिलेली.
या अपघातात पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. पण काही दिवसांतच हे प्रकरण अपघाताचं नसून हा तर सुनियोजित हत्येचा कट असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. सुरुवातीला सर्वांना तो एक रस्त्यावर घडणारे हीट अँड रन चा प्रकार वाटला होता. मात्र, नंतर पोलिसांना या प्रकरणात काही गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी केलेल्या तपासात पुरुषोत्तम पुट्टेवार यांना लागलेली कारची धडक सुनियोजित पद्धतीनं घडविलेला अपघात होता आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्याच्या उद्दिष्टानं तो अपघात घडवण्यात आला होता, अशी माहिती आता पुढे आली आहे. पण या प्रकरणाचं नेमकं भिंग फुटलं कसं? तर, यासाठी कारणीभूत ठरल्या एका भुरट्या गुन्हेगारानं दिलेल्या महागड्या पार्ट्या आणि मित्रांवर खर्च केलेले पैसे.
22 मे रोजी नागपुरात एक अपघात घडला. एका भरधाव गाडीनं रस्त्यावरुन जाणाऱ्या एका 82 वर्षीय वृद्धाला उडवलं. हिट अँड रनची केस असल्याचं मानून पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद केली आणि तपास बंद केला. पण ते म्हणतात ना, सत्य कधी ना कधी तरी समोर येतंच. असंच काहीसं या प्रकरणात झाल्याचं पाहायला मिळालं आणि अखेर या सुनियोजित कटाचं भिंग फुटलं. पण या प्रकरणाचं भिंग पुटण्यासाठी कारणीभूत ठरल्या काही पार्ट्या. हो काही पार्ट्यांमुळे या प्रकरणाचं भिंग फुटलं.
भुरट्या चोराच्या महागड्या पार्ट्या, हत्येच्या कटाचं भिंग फुटलं
कधीही कोणत्याही मित्राला दारू न पाजणारा, कधी ही मित्रांना पार्ट्या न देणारा आणि नेहमीच लोकांकडून पैसे उसने मागणारा नीरज निमजे अचानक मित्रांना पार्ट्या देऊ लागला, दारूचे महागडे ब्रँड ऑफर करू लागला. त्यामुळे काहींना त्याच्यावर शंका आली. खबऱ्यांमार्फत चिल्लर गुन्हेगार असलेल्या नीरज निमजेकडे अचानक भरपूर पैसा आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलीस कामाला लागले.
पोलिसांनी निरजच्या अवतीभवती खबरी पेरले. एका अपघाताच्या प्रकरणातून नीरज निमजेकडे भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं हलवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कुठे अपघाताचं प्रकरण घडून अजूनही आरोपी चालक सापडलेले नाही, याची माहिती घेणं सुरू केलं आहे. तेव्हा बालाजीनगर भागातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांचं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी नीरज निमजेला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघाती नसून सुनियोजित हत्या केल्याची कबुलीच नीरज निमजेनं दिली. त्यामुळे एका भुरट्या गुन्हेगारानं दिलेल्या काही महागड्या पार्ट्या अपघातातून घडवलेल्या हत्येचा प्रकरण सर्वांसमोर आणण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.