वेकोलिचा गाळ नद्या संपवायला निघाला
– नरेश पुगलिया यांची जनहित याचिका
– जिल्हाधिकार्यांच्या अहवालातही नद्या गाळयुक्त होत असल्याची चिंता
चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
चंद्रपूर महानगराची आणि पंचक्रोशीची जीवनवाहिनी असलेल्या इरई व झरपट नद्या कमालीच्या प्रदुषित झाल्याची चिंता व्यक्त करीत, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली.
जिल्हाधिकारी यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार समिती गठित केली असून, समितीच्या अहवालातही पद्मापूर मिनगाव, भटाळी, हिंदुस्थान लालपेठ आदी खाणींचा गाळ या नदीपात्रात येत असल्याचे नमूद आहे. ही अत्यंत धोकादायक बाब असून, ‘इरई’, ‘झरपट’ला वाचवा होऽऽ़, नद्यांचे नाले होत आहेत, असा आक्रोश शनिवारी येथे पत्रपरिषदेत पुगलिया यांनी केला. प्रसंगी मोठे आंदोलन उभारू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पुगलिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत, चंद्रपूर जिल्हयातील इरई व झरपट नदींचे संवर्धन करणे, संरक्षक भिंत उभारणे, खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हेसुध्दा प्रतिवादी असून, त्यांनी दोन्ही नद्यांच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी समिती गठित केली. वेकोलिकडून कोळसा उत्पादनानंतर प्रक्रियायुक्त पाणी व कचरा इरई नदीपात्रात सोडले जात असल्याच्या प्रकरणात चंद्रपूच्या जिल्हाधिकार्यांना पाच आठवडयात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी, 8 जून 2024 रोजी शपथपत्र दाखल करून, इरई व झरपट नदीच्या संवर्धन व संरक्षणास तसेच झालेल्या विद्रुपीकरणास वेकोलि जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या लेखी उत्तर स्पष्टपणे नमूद केले आहे की, वेकोलिच्या पद्मापूर खाणीची पातळी ही इरई नदीच्या बरोबरीने असल्यामुळे वाळूमिश्रीत माती व गाळ हा इरई नदीच्या पात्रात आला आहे. भटाळी खाणीतील वाळू मिश्रीत माती ही मान्सूनच्या अतिवृष्टीमुळे नदीच्या पात्रात येते. परंतु, वेकोलि हे रोखण्याकरिता आवश्यक झाडाची लागवड करीत नाही. पद्मापूरपासून लालपेठ कॉलरी ते दुर्गापूरपर्यंत वेकोलिचे तयार झालेले मातीचे ढिगारे वेकोलिमार्फत त्वरित काढणे आवश्यक आहे. वेकोलिच्या कोळसा वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्या रस्त्यावर अत्यल्प पाण्याची फवारणी करीत असल्यामुळे वायू प्रदूषण झाले आहे, असेही अहवालात नमूद आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे
इरई व झरपट या दोन्ही नदीपात्रांची खोली व रुंदी कमी झाली असून, अतिवृष्टी झाल्यास चंद्रपूर शहराला पुराचा फटका बसतो. त्यामुळे पालकमंत्री, अन्य लोक प्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर शहर महानगरपालिका, सिंचन विभाग, बांधकाम विभाग या सर्वांनी या दोन्ही नद्यांकडे गांर्भीयाने लक्ष द्यावे. भविष्यात चंद्रपूर शहराला मोठी पाणी टंचाई होऊ शकते. त्यामुळे थातूरमातून उपायोजना न करता कायमस्वरूपी उपायोजना करणे गरजेचे आहे. या दोन्ही नद्यांच्या खोलीकरणाची संपूर्ण जबाबदारी वेकोलिची असून, त्यांनी संरक्षक भिंत व इतर विकासाचे कामासाठी लागणारा निधी द्यावा. ते देत नसेल तर जिल्हा खनिज विकासातून हा निधी द्यावा. मात्र हा गंभीर प्रश्न निकाली काढावा. पालकमंत्र्यांनी स्वतः याकडे लक्ष देऊन या दोन्ही नद्यांचे संरक्षण करावे, अशी आग्रही मागणी पुगलिया यांनी केली आहे.