गडचिरोली : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी-बियाणे तसेच कीटकनाशकांची उपलब्धता वेळेवर व्हावी याकरिता खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी बँकाना दिले. तसेच शेतकऱ्यांनी देखील कर्ज मागणीसाठी बँकेकडे लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्री भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पीक कर्जाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच घेण्यात आला, यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत घोंगळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नारायण पौणीकर, भारतीय रिझर्व बँकेचे क्षेत्रीय अधिकारी श्री गणवीर, आरसेटीचे संचालक कैलास बोलगमवार, युवराज टेंभुर्णे, तसेच विविध बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री भाकरे यांनी पुढे सांगितले की पाऊस पडायला सुरूवात झाली असल्याने शेतकऱ्यांकरिता पुढील तीन-चार आठवडे महत्वाचे असून बँकानी त्यापुर्वी विशेष मोहिम राबवून खरीप पिक कर्ज वाटप पुर्ण करावे. राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँकांतर्फे पीककर्ज वाटपाची गती वाढवावी. पीक कर्जासोबतच बँकांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांतर्गत प्राधान्यक्रम क्षेत्रात (कृषी, कृषी संलग्न व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, गृह कर्ज, शिक्षण, वनीकरण इत्यादी ) कर्जवाटपाचे जास्तीत काम करण्याचे व चालु आर्थिक वर्षासाठी मागील वर्षीपेक्षा जास्त उद्दिष्ट ठेवण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्याला चालू आर्थिक वर्षात एकूण 1770 कोटी वार्षिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी कृषीसाठी एकूण 650 कोटी त्यात खरीप पीक कर्जासाठी३३५ कोटी व रब्बी साठी 50 कोटी व कृषी मुदत कर्जासाठी 265 कोटीचे उद्दीष्ट आहे. याशिवाय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमइ) 420 कोटी, इतर प्राथमिक क्षेत्रासाठी 150 कोटी व प्राथमिक क्षेत्र वगळून 550 कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात 31 मे 2024 पर्यंत 76 कोटीचे खरिप पीक कर्ज वाटप झाले आहे.
मागील आर्थिक वर्षात एकूण 1675 कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते यात जिल्ह्याने 1941.17 कोटीचे कर्जवाटप करून चांगली कामगिरी करत 115.89 टक्के उद्दिष्ट साध्य केले. त्यात पीक कर्जासाठी 375 कोटीच्या उद्दिष्टापैकी 189 कोटी 63 लाख खरिप व 14 कोटी 7 लाख रब्बीसाठी असे एकूण 203 कोटी 70 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सादर केली.
खत वाहतुकीचा भुर्दंड शेतकऱ्यांवर नको
खत वाहतुकीचा भुर्दंड शेतकऱ्यांवर पडू नये असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यासाठी रामागुंडम येथील नॅशनल फर्टीलायझर कंपनीद्वारे जिल्ह्याभरात रोड वाहतूक द्वारे खत उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित कंपनीस पत्र देण्याचे तसेच वडसा रेल्वे स्टेशनवरील खतरॅकपॉईंटला पावसापासून बचावासाठी छत बांधून बंदिस्त खोली वाढविण्याकरिता विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर यांना सुद्धा पत्र देण्याच्या सूचना श्री भाकरे यांनी दिल्या.
तक्रार निवारण कक्ष सक्रीय ठेवा
बी-बीयाणे, खते, किटकनाशक व पीककर्जाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्रभावीपणे निकाली काढण्यासाठी स्थापण करण्यात आलेले तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्ष सक्रीयपणे कार्यरत राहण्याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या विविध योजनांची कर्ज प्रकरणे, आरसेटी अंतर्गत प्रशिक्षणाच्या कामकाजाचा तिमाही आढावा घेतला.
बैठकीला संबंधीत अधिकारी व विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.