उद्या पासून भरती प्रक्रियेला सुरूवात
चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
चंद्रपूर पोलिस दलात पोलिस शिपाई भरती होत आहे. 19 जून रोजी सकाळी 5 वाजेपासून येथील जिल्हा क्रिडा संकुलात होणार्या या भरतीमध्ये एकूण 137 पोलिस शिपाई व 9 ‘बॅण्डस्मन’ची रिक्त पदे भरण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सोमवार, 17 जून रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू उपस्थित होत्या.
पोलिस शिपाई पदासाठी एकूण 22 हजार 583 आवेदन प्राप्त झाले असून, त्यामध्ये पुरुष उमेदवार 13 हजार 443, महिला उमेदवार 6 हजार 315 तसेच 2 तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे. तर, ‘बॅण्डस्मन’ पदाकरिता पुरुष उमेदवार 2 हजार 176, महिला उमेदवार 646 तसेच 1 तृतीयपंथी उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे उमेदवारांची हजेरी घेऊन, छाती, उंची मोजमाप करुन त्यांचे कागदपत्र तपासण्यात येतील. बायोमॅट्रीक हजेरी घेऊन चेस्ट क्रमांक वाटप केल्यानंतर शारिरीक चाचणीकरीता उमेदवारांना मैदानावर पाठविण्यात येईल. पुरुषांची 100 मिटर/1600 मिटर व महिलांची 100 मिटर/800 मिटर धावण्याची चाचणी ही कृत्रीम धावपट्टीवर घेण्यात येईल. उमेदवारांना कृत्रीम धावपट्टीवर ‘स्पाईक शूज’ वापरता येणार नाही. कोणतेही उत्तेजनार्थ पदार्थाचे सेवन करणार नाही याबाबत उमेदवारांकडून हमीपत्र घेण्यात येईल. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे घेण्याकरिता आरएफआयडी पध्दतीचा वापर करण्यात आला आहे. बाहेरगावातील उमेदवारांना रात्रीला पाऊस आल्यास झोपण्याची व्यवस्था पोलिस मुख्यालयातील ‘ड्रिल शेड’मध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती सुदर्शन यांनी दिली.
उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये
ही भरतीप्रक्रिया चित्रफितीवरील चित्रण तसेच सिसिटीव्हीच्या निगराणीमध्ये घेण्यात येणार असल्याने उमेदवारांनी कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये. पोलिस शिपाई म्हणून भरती करुन देतो, असे कुणी सांगत असल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.