चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
चंद्रपुरमध्ये खासदाराच्या भावाने खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समोरच त्यांच्या भावाने आणि कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
या घटनेचा व्हीडिओ आता समोर आल्याने खासदार धानोरकर यांच्या प्रतिमेला धक्का पोचला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण आहे. ही खाण कर्नाटक सरकारची असून या खाणीतील कोळसा वाहतुकीमुळे पिकांना मोठा फटका बसत होता. खासदार प्रतिभा धानोरकर या समस्येविषयी व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या.
त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ प्रवीण काकडे आणि असंख्य कार्यकर्ते होते. अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच प्रवीण काकडे यांनी अधिकाऱ्याला विचारपूस करता-करता शिवीगाळ केली आणि त्याचवेळी एका व्यक्तीने त्या अधिकाऱ्यांना कानशिलात लगावली असल्याचा व्हिडीओ समोर येत आहे. खुद्द खासदारांच्या सख्ख्या भावानेच शिवीगाळ करायला सुरुवात केल्याने निकाल लागताच मुजोरी सुरु झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, कर्नाटक एम्टा खाण व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष जीभकाटे यांनी, यावर बोलण्यास नकार दिला असून असे काही घडले नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.