पुणे : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
पुण्यातील फुरसुंगी पावर हाऊस परिसरात सकाळच्या सुमारास पाण्याचा टँकर पोहोचला आणि नागरिकांनी पाणी भरण्यासाठी एकच गर्दी केली. मात्र, थोड्यावेळात अचानक पाणी थांबले.
टँकरमधील पाईपमध्ये साडी अडकल्याचं दिसून आलं. यामुळेच टँकरमधून पाणी येणं थांबलं होतं. सुरुवातीला हा साडीचा छोटा तुकडा असल्याचं समजून तो काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, साडीचा तुकडा निघत नव्हता. अखेर टँकरवर चढून त्याचे झाकण खोलून आत पाहिले… त्यावेळी आतमधील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.
पाण्याच्या टँकरमध्ये चक्क एका महिलेचा मृतदेह आढळून आला. टँकरमध्ये महिलेचा मृतदेह दिसल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती तात्काळ स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याचं वृत्त मिळताच पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली.
पोलिसांनी टँकरमधून महिलेचा मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. तसेच संबंधित टँकरही ताब्यात घेतला आहे. मृतक महिलेची ओळख पटली असून तिचे नाव कौशल्या मुकेश चव्हाण असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस निरीक्षक मानसिंह पाटील यांनी सांगितले की, मृतक महिला ही आपला पती आणि दोन मुले यांच्यासोबत राहते. पुण्यातील हांडेवाडी परिसरात राहते. कोंढवा पोलीस ठाण्यात ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच ही आत्महत्या आहे की हत्या याचाही तपास करण्यात येत आहे. मृतक महिलेच्या अंगावर कोणत्याही प्रकराचे व्रण नसल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला तो टँकर हांडेवाडी येथील पुरुषोत्तम ससाणे यांचा आहे. त्यांचा पाणी टँकरचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी आपल्या घराजवळ टँकर उभा केला आणि गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे टँकर घेऊन पाणी पुरवठा करण्यासाठी निघाले. फुरसुंगी येथील पावर हाऊस परिसरात पाणी टँकर घेऊन पोहोचले आणि पाणी सोडण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पाणी आले आणि त्यानंतर पाणी येणं अचानक बंद झाले. पाईपमध्ये पाहिले असता आतमध्ये साडी अडकल्याचं दिसून आलं. ही साडी निघत नसल्याने पाण्याच्या टँकरवर चढून पाहण्यात आले त्यावेळी आतमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला.