अमरावती : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह १५ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या खासदार जनसंपर्क कार्यालयाचे कुलूप तोडून जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील खासदार जनसंपर्क कार्यालयाचा ताबा मिळत नसल्याने आमदार यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे यांनी शनिवारी (ता. २२) थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात धडक दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक सुरू होती. या बैठकीत प्रवेश करून यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. त्यानंतर जनसंपर्क कार्यालयाचे टाळे तोडून ते ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या पोषणाबाजीमुळे वातावरण चांगलेच तापले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात खासदार जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाचा ताबा आतापर्यंत मावळत्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे होता. त्यानंतर नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी रितसर पत्रव्यवहार करीत या कार्यालयाचा ताबा मागितला, मात्र याच दरम्यान राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या कार्यालयाचा ताबा मागितला. त्यामुळे प्रशासनाने वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली, शिवाय हे कार्यालय दोन्ही खासदारांना निम्मे निम्मे देण्यावर विचार सुरू झाला. त्यातच शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचीबैठक सुरू असताना यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी महापौर विलास इंगोले यांच्यासह काही कार्यकर्ते त्याठिकाणी पोहोचले व त्यांनी कुलूपबंद असलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या चाव्या मागितल्या.
पालकमंत्र्यांनी आपण चर्चा करू,असे सांगताच यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या. चाव्या मिळत नसल्याचे पाहून काँग्रेसचे पदाधिकारी संतापले आणि घोषणाबाजी करीत ते जनसंपर्क कार्यालयाच्या जवळ आले. यावेळी तेथे पोलिसांनी केलेले बॅरिकेटिंग तोडून ही मंडळी दारापर्यंत गेली. पोलिसांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.