चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
ज्या जीवाला पोटात 9 महिने आनंदाने वाढवलं त्याला जन्म दिल्यानंतर 9 महिन्यांनी पोटच्या गोळ्याला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. ९ महिन्यांच्या बाळाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला.
इतकंच नाही तर वैतागलेल्या आईनं स्वत: विष प्राशन करुन आयुष्य संपवलं आहे. ही धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली आहे.
ही धक्कादायक घटना वरोरा तालुक्यातील शेगाव इथे घडली आहे. देश इतका पुढे गेला मात्र अजूनही घरातल्या लक्ष्मीला हुड्यांसाठी किंवा घरातल्या कामावरुन छळण्याचे प्रकार कमी झाले नाहीत. हे धक्कादायक वास्तव आहे चंद्रपुरातलं. पल्लवी पारोधे असं मृत 27 वर्षीय महिलेचं नाव आहे. तिने कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं.
पल्लवीने कौटुंबिक वादातून विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आपल्यानंतर बाळाचं कसं होणार या विचाराने तिने आपल्या 9 महिन्यांच्या मुलालाही विष पाजलं. मुलाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मुलाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या दुर्घटनेत आईचा मृत्यू झाला. मुलाच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरपलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेच्या आईनं पोलिसांना दिलेल्या जबाबावरुन हुंडाबळीची तक्रार दाखल झाली आहे. नवरा आणि दीर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हुंड्यासाठी पल्लवीचा छळ होत होता अशी प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी चंद्रपूर पोलीस तपास करत आहेत.