Tuesday, February 11, 2025
HomeUncategorizedरुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, आक्रोश अन किंकाळ्या....., मृतदेह पाहून शिपायाला हार्ट अटॅक

रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, आक्रोश अन किंकाळ्या….., मृतदेह पाहून शिपायाला हार्ट अटॅक

हाथरस (उ.प.) : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका सत्संगादरम्यान मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत ११६ भाविक ठार झाले. मृतकांत महिला, लहान मुलांचा अधिक समावेश आहे.

कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली हाेती. कार्यक्रम संपल्यानंतर भाविक बाहेर पडायला लागले तेव्हा एकच गाेंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. महिला आणि मुले पायदळी तुडविली गेली. संपूर्ण परिसरात केवळ लाेकांच्या किंकाळ्या आणि ओरडण्याचा आवाज ऐकू येत हाेता. सरकारी रुग्णालयाबाहेर भयावह परिस्थिती हाेती. रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच पडला हाेता.

हाथरसपासून ४७ किमी अंतरावर सिकंदराराऊजवळच्या फुलरई गावात नारायण साकार हरी ऊर्फ भाेले बाबांचा सत्संग आयाेजित केला हाेता. त्यास हजाराे भाविक उपस्थित हाेते. सत्संग झाल्यानंतर भाेले बाबांच्या पायाखालील माती घेण्यासाठी भाविकांचे लाेंढे धडकले आणि ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. कार्यक्रम मोकळ्या जागेत होता. पावसामुळे चिखल होता. बाहेर पडण्यासाठी लोक धावले. त्यावेळी काही घसरून पडले व चेंगराचेंगरी झाल्याचेही सांगण्यात येते.

श्वास काेंडल्यामुळे मृत्यू?

सत्संग झाल्यानंतर भाेले बाबांचा ताफा रवाना झाला. सुरक्षारक्षकांनी भाविकांना थांबवून ठेवले हाेते. ताफा गेल्यानंतर गर्दीला अचानक साेडले. दरवाजा गर्दीच्या तुलनेने लहान ठरला. धक्काबुक्की सुरू झाली. चिखलात घसरुन महिला, मुले एकमेकांवर पडली. लाेक त्यांना चिरडून गेले. श्वास काेंडल्यामुळे बहुतांश मृत्यू झाले, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.

गुप्तचर खात्याची नाेकरी साेडून बनले ‘भाेलेबाबा’ प्रवचनकार

नारायण साकार हरी असे भाेले बाबांचे नाव आहे. एटा जिल्ह्यातील बहादूरनगरी गावातील ते रहिवासी आहेत. तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. गुप्तचर खात्यात ते नाेकरी करीत हाेते. १९९०मध्ये नाेकरी साेडून त्यांनी अध्यात्माचा मार्ग पत्करला. साकार विश्व हरी असे नाव घेतले. पांढरा सूट, टाय आणि पांढरे जाेडे असा त्यांचा पेहराव असताे. स्वत:ला हरीचा शिष्य म्हणवतात.

मृतदेह पाहून शिपायाला हार्ट अटॅक

चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या भाविकांचे मृतदेह आणि जखमी लाेकांना एटा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे एवढ्या माेठ्या संख्येने मृतदेह पाहून रुग्णालयात तैनात असलेल्या एका शिपायाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. हा शिपाई अवागड येथे तैनात हाेता. आपत्कालीन परिस्थिती पाहून त्याला एटा येथे पाठविण्यात आले. मात्र, तेथील परिस्थिती पाहून ताे ताण सहन करू शकला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!