Thursday, March 20, 2025
HomeUncategorizedएकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीवर कैचीने सपासप वार; माथेफिरुच्या कृत्याने देवळी तालुक्यात...

एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीवर कैचीने सपासप वार; माथेफिरुच्या कृत्याने देवळी तालुक्यात खळबळ

वर्धा : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातून एक थरारक घटना उजेडात आली आहे. भिडी या गावातील एका माथेफिरू युवकाने २३ वर्षीय युवतीवर कैचीने सपासप वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत माथेफेरू आरोपी युवकास अटक केली आहे. त्याचे नाव संदीप मसराम असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी संदीप हा युवतीच्या गावातीलच आहे. ही युवती स्वतःच्या घरी एकटीच होती. आपल्या घराच्या अंगणात ती भांडे घासत होती. त्याच वेळी आरोपी तिथे आला. त्याने युवतीच्या गळ्यावर कैचीने सपासप वार करणे सुरू केले. लगेच पळून गेला. युवतीच्या किंकाळीने सर्वत्र आरडाओरड झाली.

याच परिसरात राहणारे प्रदीप राऊत व पुरुषोत्तम रेगे यांनी हा प्रकार पाहिला. त्यांना युवती रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आली. त्यांनी कुंपण ओलांडून घरात प्रवेश केला. तत्परतेने हालचाल केली. वार करीत पळून जाणारा आरोपी संदीप हा सदर युवतीच्याच घरात लपून बसला होता. हे माहीत होताच गावाकऱ्यांनी त्याला ताब्यात घेत चांगलाच चोप दिला. पुढे त्यास देवळी पोलिसांच्या ताब्यात दिले. इकडे जखमांनी व्हिवळणाऱ्या युवतीस पुरुषोत्तम रेगे यांनी त्यांची मुलगी पूजा हिची मदत घेत दुचाकीवर बसवून भिडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यावर तिला सावंगी येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या रुग्णालयात आता तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. देवळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असल्याची चर्चा होत आहे. मात्र एका लहान गावात घडलेल्या या हिंसक जीवघेण्या कृत्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. चार वर्षांपूर्वी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून युवतीस जाळण्याचा प्रकार घडला होता. भरदिवसा घडलेल्या या प्रकारात अंकिता नामक युवतीचा काही दिवसांच्या उपचारानंतर करुण अंत झाला होता. या घटनेचे पडसाद देशात उमटले होते. तसेच याच देवळी परिसरात एका नशेडी युवकाने काही दिवसांपूर्वी एका इसमाचा दगडाने ठेचून खून केला होता. ही घटना पाहणारे अनेक असूनही कोणी मदतीस धावले नव्हते. मात्र युवतीवर झालेल्या हल्ल्यात लगेच शेजारी असलेले मदतीस धावल्याने तसेच वेळेवर उपचार मिळाल्याने युवतीचे प्राण वाचले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!