गडचिरोली : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
नगररचना विभागातील सहायक संचालकास खून प्रकरणात झालेल्या अटकेनंतर जिल्ह्यातील भूखंड घोटाळा चर्चेत आहे. अशातच शहरात कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याचे प्रकरण उजेडात आले आहे. बनावट संमतीपत्राआधारे एन.ए. परवाना मिळवून भूखंडाची परस्पर विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी बहीण- भावाला ८ जुलै रोजी गडचिरोली पोलिसांनी अटक केली.
कंत्राटदार नागनाथ किसनराव भुसारे (रा. साईमंदिराजवळ, चामोर्शी रोड, गडचिरोली) असे तक्रारदाराचे नाव आहे. जयश्री आनंद चंद्रिकापुरे (रा. गडचिरोली) व विशालकुमार चंद्रकांत निकोसे (रा. गडचिरोली, हमु. हिंगणा ता. नागपूर) या बहीण -भावांचा आरोपींमध्ये समावेश आहे. कंत्राटदार भुसारे यांच्या फिर्यादीनुसार, शहरातील सोनापूर येथील सर्वे क्र. १८ /१ मधील ०.५१.५९ हेक्टर आर जमीन सुरेश नानाजी नैताम व इतर सामाईक शेतमालकांकडून खरेदीचा सौदा भुसारे यांच्यासह जयश्री चंद्रिकापुरे व विशालकुमार निकोसे यांनी मिळून केला होता. या जमिनीच्या रजिस्ट्रीसाठी पैसे कमी पडत असल्याने बहीण- भावांनी भुसारे व मनोज प्रभूदास सुचक यांची भेट घेऊन सध्या रजिस्ट्रीसाठी तुम्ही रक्कम द्या व आम्हा बहीण- भावाला हिस्सेदार ठेवा, असा प्रस्ताव ठेवला. त्यावर भुसारे व सुचक यांनी हाेकार दिला. भुसारे यांनी २४ लाख तर सुचक यांनी २४ लाख १३ हजार रुपये असे एकूण ४८ लाख १३ हजार रुपये उपलब्ध करुन दिले.
२३ ऑगस्ट २०२२ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्री करुन घेण्यात आली. ७/१२ मधील मूळ मालकाचे नाव कमी करून जयश्री चंद्रीकापुरे, विशालकुमार निकोसे, मनोज सुचक तसेच नागनाथ भुसारे अशा चौघांची नावे लावण्यात आली. मात्र, नंतर बहीण – भावाने मिळून संमती न घेता येथे भूखंड पाडून त्याची प्रती प्लॉट ४० लाख रुपयांप्रमाणे विक्री सुरु केली. त्यासाठी त्या दोघांनी गडचिरोली मुख्याधिकाऱ्यांकडे जमीन अकृषक करण्याकरता भुसारे व सुचक या दोघांचे बनावट समंतीपत्र सादर करुन नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हिस्सेवाटणी न करता परस्पर भूखंड विक्रीचे करारनामे तयार करुन भुसारे, सुचक यांच्यासह भूखंडधारकांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन ४ जुलै रोजी जयश्री चंद्रिकापुरे व विशालकुमार निकोसे यांच्यावर भारतीय दंड संहिता (बीएनएस) कलम ४६५,४६७, ४६८,४७१,४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर पो.नि. अरुण फेगडे यांनी तपास गतिमान केला. दोघा बहीण- भावांना ८ जुलै रोजी अटक करण्यात आली.
अधिकाऱ्यांना अभय?
दरम्यान, बहीण- भावांनी जमीन अकृषीसाठी प्रस्ताव सादर केला तेव्हा जोडलेले बनावट संमतीपत्र नगररचना विभागाने कसे काय मंजूर केले, असा प्रश्न या प्रकरणाने उपस्थित झाला आहे. मंजुरी देणारे अधिकारी अद्याप मोकळेच आहेत. पोलीस तपासात त्यांची चौकशी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.