Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedविदर्भात काँग्रेसने टाकला डाव, प्रतिभा धानोरकरांची फिल्डिंग; बडा मासा लागला गळाला

विदर्भात काँग्रेसने टाकला डाव, प्रतिभा धानोरकरांची फिल्डिंग; बडा मासा लागला गळाला

चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वारे वाहू लागल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले. या यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. अशातच विधानसभेसाठी तयारी करत असतानाच काँग्रेसनेही मोठा डाव टाकला आहे.

काँग्रेसने एका सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुधाकर अंबोरे यांना पक्षात प्रवेश देऊन आपला चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित केला आहे. सुधाकर अंबोरे यांनी आज(9 जुलै) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे सुधाकर आंबोरे यांना पक्षात आणण्यासाठी प्रतिभा धानोरकर यांनीच फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसही एका सक्षम उमेदवाराच्या शोधात होती आणि अंबोरे यांच्या रुपात त्यांना तो सक्षम उमेदवार मिळाला असल्याची चर्चा सध्या चंद्रपुरात सुरू आहेत. अंबोरे यांच्यासोबत व्यावसायिक राहुल तायडे यांनीसुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकाराने पक्ष प्रवेश झाला असल्याने अंबोरे यांना विधानसभेत तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. पण दुसरीकडे अंबोरे यांच्या पक्षप्रवेशाने गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते आणि इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे महेश मेंढे यांना फक्त 15 हजार मते मिळाली होती. तर चंद्रपूरमध्ये डॉ. राजेश कांबळे, प्रवीण पडवेकर, बाळू खोब्रागडे हे सध्या चंद्रपूरमधील इच्छूक उमेदवार आहेत. या सर्वांचे मन राखण्यात धानोरकरांना यश येते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला चंद्रपूर मतदार संघ गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसला जिंकता आला नाही. भाजपचे नाना श्यामकुळे दोन वेळा या मतदारसंघाचे आमदार होते. पण त्यांनी चंद्रपूरकडे कधीच म्हणावे असे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मतदारांचीही नाराजी होती.

गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी त्यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यताही दिसत नाही. पण भाजपचे स्थानिक नेत्यांशीही त्यांचे सूर जुळत नाहीत. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला असला तरी मुंनगटीवार यांच्याशीही त्यांचे फारसे पटत नसल्याने त्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यताही धूसर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!