गोंडपिपंरी : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
मरावे परी किर्तीरूपे उरावे’ या म्हणीचा प्रत्यय गोंडपिंपरी तालुक्यातील मक्ता या अतिशय छोट्या गावातील गजानन सोमा चांदेकर (८५) या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका गरीब कुटूंबात जन्मलेल्या व स्वकर्तृत्वातून सर्वस्व मिळविणाऱ्या व्यक्तीच्या अंतिम यात्रेत आला. हजारो लोकांची गर्दी, पन्नास वाहनांचा ताफा, फटाक्यांची आतिशबाजी अशी वाजत गाजत गजानन चांदेकर यांची अंत्ययात्रा निघाली. या व्यक्तीच्या मृत्यूने संपूर्ण गाव भावूक झाले होते.
गोंडपिंपरी या अतिशय मागास तालुक्यातील भंगारात तळोधी गावालगत मक्ता येथील रहिवासी असलेले गजानन सोमा चांदेकर यांचा शनिवारी मृत्यू झाला. अतिशय गरीब कुटूंबात जन्माला आलेल्या गजानन चांदेकर यांनी काहीतरी करून दाखविण्याच्या जिद्दीत आणि गरीब परिस्थितीवर मात करण्यासाठी मक्ता गाव सोडावे लागले.
गोंडपिंपरी तालुक्यातीलच गोजोली जवळील चिवंडा येथे कुटुंबाला घेऊन स्थायिक झाले. चांदेकर यांना आनंद, विनोद व सुदेश ही तीन मुलं. अतिशय बेताची व गरीब परिस्थिती असतांना त्यांनी मुलांवर संस्कार केले. अतिशय हलाकीच्या परिस्थितीत एका भावाने चार चाकी वाहनावर चालक, एकाने मजूरी तर एक सैन्यात रूजू झाला. संयुक्त कुटूंबात तिन्ही भावंड परिश्रम करित होते. अशातच आठ ते दहा वर्षापूर्वी वडील व तिन्ही भावंडांनी तेंदूपत्ता व्यवसाय सुरू केला.
तिन्ही मुलांनी वडिलांच्या मदतीने व्यवसायात चांगलाच जम बसविला आणि त्रिमूर्ती भाई भाई ट्रेडर्स या कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अतिशय ग्रामीण भागातून पुढे येत यशस्वी व्यवसायाचा नवा पायंडा पाडला. आता तेंदूपत्ता व्यवसायात चांगलाच जम बसविला आहे. दरम्यान ८५ वर्षीय गजानन चांदेकर यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली. अनं वडिलांच्या उपचारासाठी मुलांनी सर्व पातळींवर प्रयत्न केले. पण शनिवारी त्यांचे निधन झाले. गजानन चांदेकर यांचे निधनाने कटुंबियावर दुःखाचे सावट कोसळले.
जे वडिल आपल्यासाठी प्रेरणेची मशाल ठरले. त्यांचा अंतीम संस्कार एक आगळा वेगळा सोहळा ठरावा यासाठी मुलांनी असे नियोजन केले की सारे गाव बघित राहिले. चांदेकर यांच्या अंतिम संस्कारात शेकडो लोक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पन्नासहून अधिक चार चाकी वाहनांचा ताफा, फटाक्यांची आतिषबाजी अनं वाजत गाजत चांदेकर यांची अंतीम यात्रा निघाली. चीवंडा ते गोंडपिपरी, अनं गोंडपिपरी ते मक्ता या मार्गांवरून निघालेली ही अंत्ययात्रा तालुक्यात चर्चेचा विषय ठरली.
वडीलोपार्जीत मक्ता येथील शेतात चांदेकर यांचे पार्थिवावर अंतिम संस्कार पार पडले. यावेळी परिसरातील गणमान्य व्यक्ती हजर होते. संयुक्त कुटूंबात वास्तव्य असलेल्या आनंद, विनोद अनं सुदेश या तीन भावंडांनी सामाजिक बांधूलकी जोपासली आहे. गरीबांना सर्व प्रकारची मदत करणे, विविध सामाजिक उपक्रमात त्यांनी मोठा वाटा उचलला आहे. अनेक रुग्णांच्या मदत करीत त्यांनी सामाजिक संवेदना जोपसल्या आहेत.
अतिशय गरिब स्थिती असतानाही वडिलांनी आमच्यावर संस्कार केले. आज आम्ही थोडेफार यश मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आमच्या वडिलांची मोठी प्रेरणा राहिली आहे. वडीलांचा शेवटचा प्रवास अतिशय सुखद व्हावा अतिशय आगळा वेगळा निरोप अंतिम यात्रेच्या माध्यमातून दिला अशी प्रतिक्रिया मुलगा विनोद चांदेकर यांनी व्यक्त केली.