मूल : (प्रतिनिधी)
धान उत्पादक शेतकऱ्यांनी तक्रार करूनही पिक विमा मिळाला नाही. पाऊस झाला नसल्याचे कारण पुढे करून हजारो शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे.
मागील खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा काढून आपल्या पिकाला संरक्षण कवच दिले होते. अवकाळी पाऊस झाल्यानंतर लगेच शेतकऱ्यांनी ऑनलाइन/ ऑफलाईन माध्यमातून कंपनीकडे नियमानुसार तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत पिक विमा कंपनी/कृषी विभाग कडून रोजंदारी मुलांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण केल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला.
शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा निधी मंजूर करण्यात आला. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अवकाळी पाऊस झाल्यानंतर पिकाचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांनी तक्रार केली अशा शेतकऱ्यांचे अर्ज पाऊस झाला नसल्याचे पुढे करून अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे हे सर्व शेतकरी पिक विमा मिळण्यापासून वंचित राहिले आहेत.
मुल तालुक्यातील काही निवडक शेतकऱ्यांनाच पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आली आहे. मोजक्याच लोकांना पिक विमा रक्कम देऊन उर्वरित शेतकऱ्यांना पाऊस झाला नसल्याचे कारण पुढे करून व अर्ज रद्द करून पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी पिक विमा मिळण्यापासून वंचित झाले आहेत.
याबाबत शेतकऱ्यांनी द ओरिएंटल इन्शुरन्स पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार लेखी/ तोंडी माहिती देऊनही सहकार्य करीत नसल्याने व शेतकऱ्यांना उद्धट वागणूक देत असल्याने शेतकऱ्यांनी द ओरिएंटल इन्शुरन्स पिक विमा कंपनी बाबत संताप व्यक्त केला आहे.
“शुभम बन्सोड, (आरओ) दि ओरिएंटल इन्शुरन्स पिक विमा कंपनी, चंद्रपूर यांनी “नो रेनफॉल” असा चुकीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला. तसेच मुल तालुक्यातील पाच हजाराच्या वर शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट केले. त्यामुळे हे सर्व शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित झाले. त्यामुळे उद्धट वागणाऱ्या या पिक विमा अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.”
तरी शासनाने, स्थानिक लोकप्रतिनिधीनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे