गडचिरोली : (जिल्हा प्रतिनिधी)
मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे दक्षिण गडचिरोलीतील काही उपनद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. यामुळे दोन प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. सिरोंचात अतिवृ्ष्टी झाल्याने तेथील विद्यार्थी आणि अन्य नागरिकांसह एकूण ११२ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान या भागात हवामान विभागाने पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट जारी केला आहे.
भामरागड आणि सिरोंचा तालुक्यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडला. भामरागड तालुक्यातील कुडकेली नाल्याला पूर आल्याने तेथील रस्ता वाहून गेला. यामुळे आलापल्ली-भामरागड मार्ग बंद आहे. बेजूरपल्ली नाल्याला पूर आल्याने आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बांडिया नदीच्या पुरामुळे एटापल्ली-गट्टा-आलदंडी मार्ग आणि एटापल्लीनजीकच्या स्थानिक नाल्याला पूर आल्याने चोखेवाडा-एटापल्ली-आलापल्ली हे मार्ग बंद होते. परंतु दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. मागील चोवीस तासांत सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक १८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल भामरागड तालुक्यात ७७.७ मिलिमीटर पाऊस पडला.