नवी दिल्ली : (विशेष प्रतिनिधी)
तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार असलेले झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या राज्यपालपदाचा बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यासोबतच त्यांनी इतर राज्यांतील राज्यपालांच्या नव्या नियुक्त्यांची घोषणा केली. तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार असलेले झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील. तर, भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. राधाकृष्णन यांनी तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून १९९८ आणि १९९९ दोन वेळा विजय मिळवला. मात्र, २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यानंतर १८ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.