Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedगडचिरोली वन विभागात रोपवन लागवड घोटाळा; चातगाव वनपरिक्षेत्र अधिकारी पडवे निलंबित

गडचिरोली वन विभागात रोपवन लागवड घोटाळा; चातगाव वनपरिक्षेत्र अधिकारी पडवे निलंबित

गडचिराेली : (जिल्हा प्रतिनिधी)

चातगाव वनपरिक्षेत्रात रोपवन लागवड, खोदतळे, रोहयोची कामे, वाघांच्या संवर्धनासह अन्य उपाययाेजना आदी कामांमध्ये घोळ केल्याप्रकरणी आरएफओ एस.बी.पडवे यांची तक्रार वरिष्ठ स्तरावर करण्यात आली हाेती.

त्यानुसार सदर प्रकरणाची चाैकशी झाल्यानंतर यात अनियमितता आढळल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पडवे यांना निलंबित करण्यात आले. चातगाव वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या निर्देशावरून वनरक्षक, वनपालांनी अनेक कामांवर अनेक बोगस मजूर दाखवून शासकीय निधी हडप केला असल्याची चर्चा होती. याशिवाय वनपरिक्षेत्रात अतिक्रमण, अवैध उत्खनन, वृक्षतोडही झाल्याचा संशय होता. यावरूनच भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी मुख्य वन संरक्षकांकडे तक्रार केली हाेती. दरम्यान, आरएफओने वनपालामार्फत आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी खरवडे यांनी केली होती. दरम्यान, मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली. त्यात पडवे दोषी आढळले. प्रधान सचिवांच्या निर्देशानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

गडचिरोलीवनविभागातील चातगाव वनपरिक्षेत्रात मार्च २०२१ ते २०२४ या कालावधीत रोपवन लागवड, हेक्टरी मोजमाप, हेक्टरी लावण्यात आलेली झाडे आणि जगविलेली झाडे, प्रत्यक्ष लागवड न करता पैशाची उचल करणे आदी प्रकारचा घाेळ झाल्याची तक्रार आरोप भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केली होती.

अनेक कामांमध्ये अनियमितता

वन परिक्षेत्रात प्रत्येक कामावर लावलेल्या मजुरांचे व्हाऊचर, मजुरांच्या सह्यांची खात्री करणे, मोजमाप पुस्तिका, प्रत्येक मजुराची प्रत्येक कामावरील बँक खाते पुस्तिका तपासून घेतल्यास हा घोळ स्पष्टपणे दिसणार असल्याचे त्यांनी वनमंत्री, वन सचिवांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते. याशिवाय साहित्य खरेदीमधील कोटेशन, जीएसटीची बिले तपासण्याची मागणी विजय खरवडे यांनी केली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!