चामोर्शी : (उमेश गझलपेल्लीवार, तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह साजरा करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार 22 ते 28 जुलै या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा रै येथे करण्यात आले होते. आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला होता. यात अध्ययन अध्यापन साहित्य दिवस मूलभूत साक्षरता संख्याज्ञान दिवस क्रीडा दिवस सांस्कृतिक दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस इको क्लब स्थापना शालेय पोषण आहार दिवस व शेवटी समुदाय सहभाग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षण सप्ताह हा शिक्षण व विकास साठी च्या विविध पैलूंनी समावेशक असल्याने विद्यार्थ्यांनी या सप्ताहात आनंदोत्सव साजरा केला.
सर्वप्रथम 22 जुलै हा दिवस अध्ययन अध्यापन साहित्य दिवस होता. या दिवशी विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून वर्गासाठी आवश्यक असणारे विविध शैक्षणिक साहित्य तयार केले.
23 जुलै हा मूलभूत संख्या व साक्षरता दिवस होता यानिमित्ताने विविध चित्रकला रांगोळी आणि पोस्टर निर्मिती करून विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. 24 जुलै क्रीडा दिवसानिमित्ताने विविध पारंपारिक खेळांचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते.
25 जुलै सांस्कृतिक दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांनी उत्तम अश्या वेशभूषे सह कविता गीत नृत्य नाटिका एकपात्री नाटीका नक्कल आणि समूहगीत सादर केले 26 जुलै कौशल्य व डिजिटल उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे शाळेमध्ये देण्यात आले. तसेच इतर कौशल्य विकासासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेताच्या बांधावर नेऊन पेरणीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच कापडी पिशव्या बनवणे व कागदापासून लिफाफे बनवण्याची प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देण्यात आले. 27 जुलै मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब ची स्थापना उपक्रम घेण्यात आला. यात शाळेमध्ये इको क्लब ची स्थापना करण्यात आली. तसेच माता पालकांच्या हस्ते शाळेमध्ये वृक्षारोपण करून त्यांची संगोपन करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना देण्यात आली. सरते शेवटी 28 जुलै हा समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात आला. यात समाजातील दानशूर व्यक्ती नंदूजी वाघाडे व अर्चनाताई वाघाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. या शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासात वाढ होण्यात निश्चितच मदत झालेली आहे. सदर उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष मोरेश्वर गव्हारे, सर्व सदस्य, गावकरी त्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक वर्षा गौरकर, निमाई मंडल, रेखा हटनागर,प्रीती नवघडे, गौतम गेडाम,रोशन बागडे यांनी सहकार्य केले.