गडचिरोली : (जिल्हा प्रतिनिधी)
नक्षल्यांच्या अहेरी दलमचा कमांडर विकास उर्फ सैनू मुंशी जेट्टी यास छत्तीसगड पोलिसांनी गुरूवारी (दि.२९) अटक केली. जगदलपूरकडे उपचारासाठी जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला हादरा बसला आहे.
विकास उर्फ सैनू जेट्टी हा भामरागड तालुक्यातील पिडमिली येथील मूळ रहिवासी आहे. नक्षल चळवळीत तो अनेक वर्षांपासून सक्रिय असून अहेरी दलमचा कमांडर आणि विभागीय समिती सदस्य म्हणून तो कार्यरत होता. परंतु मागील काही दिवसांपासून त्याची प्रकृती बरी नसल्याने तो छत्तीसगडमधील नॅशनल पार्क एरिया कमिटीचा विभागीय सदस्य दिलीप बेंडजा याच्या सहकार्याने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात होता. मात्र, आज भटपल्ली गावाजवळच्या एका नाल्याजवळ छत्तीसगड पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून ८० हजार रुपये, नक्षल साहित्य आणि औषधही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा अशा तिन्ही राज्यांमध्ये तो सक्रिय होता. त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यात २५ हून अधिक गुन्ह्यांची नोंद असून छत्तीसगड राज्यात ८ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर १६ लाख, तर छत्तीसगड सरकारने ८ लाख असे एकूण २४ लाखांचे बक्षीस लावले होते.