Friday, February 14, 2025
HomeUncategorizedचंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, पंतप्रधान यांच्या कार्यालयाकरिता कास्ट रवाना

चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, पंतप्रधान यांच्या कार्यालयाकरिता कास्ट रवाना

सत्तेची सर्वोच्च खुर्ची बल्लारपूरच्या लाकडाची असल्याचा अभिमान – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

अयोध्येतील प्रभु श्रीरामाचे मंदीर, लोकशाहीचे मंदीर असलेले नवीन संसद भवन, जी-20 शिखर परिषद झालेले भारत मंडपम, अशा एक ना अनेक नामांकित प्रकल्पांना बांधून ठेवणारा एक समान धागा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे.

तो म्हणजे या सर्व प्रसिध्द इमारतींमध्ये बल्लारपूर येथील सागवान लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. यात आणखी एक मानाचा तुरा काल रोवला गेला. भारतातील सर्व नागरिकांना न्याय देणारी सत्तेची सर्वोच्च खुर्ची बल्लारपूरच्या लाकडाची राहणार आहे, याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

बल्लारपूर येथे महाराष्ट्र वनविकास महामंडळातर्फे देशाचे पंतप्रधान यांच्या कार्यालयाकरीता काष्ठ रवानगी करतांना वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल,भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, भाजपा शहर अध्यक्ष,काशिनाथ सिंह,प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, पियुषा जगताप, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी किशोर जैन, सहायक व्यवस्थापक गणेश मोटकर आदी उपस्थित होते.

आजचा हा कार्यक्रम अतिशय वैशिष्टपूर्ण आहे, असा उल्लेख करून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, देशाच्या सर्वोच्च नेत्यासाठी बल्लारपूर येथून काष्ठ पाठवित आहोत, हा चंद्रपूर जिल्हा, बल्लारपूर आणि वनविभागासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होणा-या खुर्चीवर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा गौरव, विकास आणि प्रगतीचे उच्चांक गाठणार आहे, यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. यापूर्वी एफडीसीएम ने अयोध्येचे राम मंदीर, लोकशाहीचे मंदीर नवीन संसद भवन, जी-20 शिखर परिषद पार पडलेले ठिकाण भारत मंडपम आदींसाठी काष्ठ पाठविले आहे. या इमारतींचा प्रत्येक दरवाचा आपल्या लाकडापासून तयार करण्यात आला आहे, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
शांती, प्रेम, सद्भावना, सहकार्य यासोबतच चिमूर क्रांतीचा आणि वाघांची भुमी असलेला चंद्रपूर जिल्हा आहे. या वाघाच्या भुमीतून पंतप्रधान कार्यालयासाठी 3018 घन फूट लाकूड दिल्लीला जात आहे. यापूर्वीसुध्दा भारत – चीन युध्दात या जिल्ह्याचे सुपूत्र तत्कालीन मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार सह्याद्रीच्या मदतीला धावून गेले. पंडीत नेहरुंच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारत – चीन युध्दात सर्वाधिक सुवर्णदान चंद्रपूर जिल्ह्यानेच दिले. अशा विरतेचे, शुरतेचे आणि पराक्रमाचे प्रतिक असलेले काष्ठ बल्लारपूर येथून जात आहे.

पुढे वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, देशात 1942 मध्ये ‘चलेजाव’ ची पहिली ठिणगी चिमूरमध्ये पडली. क्रांतीची मशाल पेटविणारा हा जिल्हा आहे. त्यामुळे बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होणा-या खुर्चीवर बसून ‘चलेजाव आतंकवाद, चलेजाव नक्षलवाद, चलेजाव जातीयवाद’ असा नारा देऊन प्रत्येक गरीबाची चिंता, त्यांच्या कल्याणाचा मार्ग या खुर्चीत बसून पंतप्रधान शोधतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केवळ पंतप्रधानांचे कार्यालयच नव्हे तर केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीचे सभागृह, विविध देशांसोबत जेथे करार केले जातात तेथील खुर्च्या आणि संपूर्ण फर्निचर बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होणार आहे. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेत तयार करण्यात आलेला 7 फुटांचा तिरंगा ध्वज आजही पंतप्रधान कार्यालयात डौलाने उभा आहे, असे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड यांनी केले. संचालक प्रज्ञा जीवनकर आणि कल्पना चिंचखेडे यांनी तर आभार सहायक व्यवस्थापक गणेश मोटकर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!