गोंदिया : (सतीश अकुलवार, मुख्य संपादक)
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात दोन वाघांमध्ये झालेल्या झुंजीत टी-९ या वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज २२ सप्टेंबर रोजी नागझिरा -१ कक्ष क्रमांक ९६ मध्ये मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
वन विभाग व वन्यजीव विभागाकडून शिकारीच्या घटनांवर अंकुश लावण्यात आल्यानंतर वन्यप्राण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांचा आलेख पाहता गोंदिया व भंडारा जिल्ह्यात वाघांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. वाघांच्या अधिवासासाठी प्रादेशिक आणि वन्यजीव जंगलांमधील पोषक वातावरण असल्यामुळे गोंदिया-भंडारा जिल्ह्यात वाघांची संख्या आता वाढत असल्याचे शुभ संकेत मिळत असताना जिल्ह्याच्या चौफेर वाघांचा अधिवास आहे. विशेष म्हणजे, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जंगल हा मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. ज्यामध्ये नागझिरा ते पेंच, नागझिरा नवेगाव- ताडोबा, नागझिरा-उमरेड, पवनी, कऱ्हांडला अभयारण्य असा एक कॉरिडोर आहे. त्यामुळे वनपरिसरात हमखास वन्यप्राण्यांचा संचार दिसून येत असतानाच वाघाचाही हा भ्रमणमार्ग आहे.
मागील २०२२ च्या गणनेनुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जवळपास २२ वाघ असल्याचे अंदाज असून यात ३ नर व ७ मादा वाघिणीसह अडीच ते तीन वर्षीय दोन वाघ व छाव्यांचा समावेश आहे. त्यातच आता चंद्रपूर जिल्ह्यातील तीन वाघिणींना नवेगाव नागझिऱ्यात सोडण्यात आल्याने वाघाच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान, आपल्या अस्तित्वासाठी या वाघांची झुंज सुरू झाल्याचे आजच्या घटनेवरून दिसून येत आहे. आज रविवारी वनपरिक्षेत्र नागझिरा अभयारण्याअंतर्गत सहवनक्षेत्र नागझिरा संकुल, नियत क्षेत्र नागझिरा १, कक्ष क्र. ९६ मधील मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात बिटरक्षक जे. एस. केंद्र, नागझिरा १ हे आपल्या चमुसह नियमीत गस्तीवर असताना साधारणतः सकाळी १० वाजताच्या सुमारास एक नर वाघ अंदाजे वय वर्षे ९ ते १० मृतावस्थेत दिसून आला.