गडचिरोली : (सतीश आकुलवार मुख्य संपादक)
राज्याच्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत. तसतशा महायुतीतील अंतर्गत धुसफूसही बाहेर य़ेऊ लागली आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. त्यावर अजित पवार यांनीदेखील उन्मेश पाटील यांना चांगलेच सुनावले होते.
त्यानंतर आता गडचिरोलीचे अजित पवार यांचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनीदेखील महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. “धनगर समाजाला आरक्षण दिल्यास मी महायुतीच्या सत्तेतून बाहेर पडणार” असा इशारा धर्मराव आत्राम यांनी दिला आहे. धर्मरावबाबा आत्राम हे अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते कॅबिनेट मंत्रीदेखील आहेत.
पण दुसरीकडे,आमदारकी घरातच राहावी यासाठी धर्मराव आत्राम आणि त्यांची मुलगी राजकीय खेळी करत असल्याचा आरोप अमरीश राव आत्राम यांनी केला आहे. त्यावर “गेल्या 40 वर्षांपासून आमदारकी माझ्या घरीच राहिली. पुढे पण राजघराण्यातच आमदारकी राहणार. पुतण्याही निवडणुकीत आहे, माझी मुलगी सुद्धा राजकारणात आहे,” अशा शब्दांत धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.