अकोला : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
रिक्षाला लागलेल्या धक्यामुळे झालेल्या वादातून अकोल्यातील हरीपेठ भागात दोन गटात तुफान राडा झाला. रिक्षासह दुचाकी वाहने जाळण्यात आली. मोठा जमाव रस्त्यावर उतरल्याने तणाव निर्माण झाला होता.
पोलिस घटनास्थळी आले असून ते जमावाला पांगवत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अमोल मिटकरी यांनी सांगितले की, या प्रकरणाची संपूर्ण माहिती माझ्याकडे नाही. मात्र जी माहिती मिळते आहे त्यानुसार रिक्षाला दुचाकीचा धक्का लागला. त्यातून बाचाबाच झाली. त्यातूनच दंगल झाली आहे. जे दोषी असेल त्यांच्यावर सरकार कारवाई करेल. मी पोलिस आयुक्तांशी देखील संपर्क साधून याची वस्तुस्थिती काय आहे याची माहिती घेणार आहे.
शुल्क कारणातून दोन समाजात दंगल होणार असेल तर हे चित्र महाराष्ट्राला शोभणार नाही. दंगल करणारे करतात पण त्याचे परिणाम संपूर्ण जिल्ह्याला भोगावे लागतात, असा संताप देखील मिटकरी यांनी व्यक्त केला. पोलिस प्रशासन कमी पडत आहे का? यासाठी आम्हाला गृहमंत्र्यांना बोलावे लागेल, असे मिटकरी म्हणाले.
नवरात्र आहे. आगामी काळ हा सणवारांचा आहे. त्यामुळे पोलिस प्रशासानेने काळजी घ्यायला हवी होती. ती घेतली गेली नसेल तर स्थानिक पोलिस ठाण्यातील लोक काय करत होते. गुप्तवार्ता विभाग असतो ना? येवढी मोठी दंगल होते तर पोलिस काय करत होतेय़ मी सत्तेत असो नसो पण नागरिक म्हणून या प्रश्नाची उत्तरे विचारेन,असे देखील अमोल मिटकरी यांनी सांगितले.