चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत.
दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला आहे? गेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघाची सद्यस्थिती काय? याविषयी जाणून घेऊया.
बल्लारपूर मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?
बल्लारपूर मतदारसंघ हा नेहमीच भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघाची निर्मिती २००८ साली झालेल्या मतदारसंघ परिसीमन आदेशांतर्गत करण्यात आली. या मतदारसंघात मूल, पोंभूर्णा, बल्लारपूर या तालुक्यांचा समावेश होता. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने या मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवले होते. तेव्हापासून आजपर्यंत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.
२००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?
२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसने राहुल नरेश पुगलिया यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत मुनगंटीवार यांचा विजय झाला. त्यांना एकूण ८६ हजार १९६ मते, तर पुगलिया यांना ६१ हजार ४६० मते मिळाली होती. याशिवाय अपक्ष उमेदवार विनोद गजानन अहिरकर हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यांना १० हजार ९२१ मते मिळाली होती. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. त्यांनी काँग्रेसच्या घनश्याम मुलचंदानी यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत मुनगंटीवार यांना १ लाख ३ हजार ७१८ मते, तर मुलचंदानी यांना ६० हजार ११८ मते मिळाली होती.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला असला तरी त्यांच्या मताधिक्यात मोठी घट झाल्याचं बघायला मिळालं होतं. या निवडणुकीत मुनगंटीवार यांना ६० हजार मते मिळाली, तर काँग्रेसच्या डॉ. झाले यांना ५० हजार मते मिळाली होती. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे राजू झोडे हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते.
या मतदारसंघातील सद्यस्थिती काय?
सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळवला असला, तरी त्यांच्या मताधिक्यात मोठी घट झाली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतीही भाजपाने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र, जिल्ह्यात विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर हे दोन गट पडले आहेत. त्यातच २२ इच्छुकांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. त्यातून एकाची निवड करताना काँग्रेसची दमछाक होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांकडून आपल्याच गटाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही गटांत समन्वय घडवून आणण्याचं आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे.
बल्लारपूरसाठी विजय वडेट्टीवार गटाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत तर प्रतिभा धानोरकर गटाकडून घनश्याम मुलचंदानी यांची नावे चर्चेत आहेत. मुलचंदानी यांनी यापूर्वी बल्लारपूरमधून निवडणूक लढली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यंदा विजय वडेट्टीवार यांच्याकडून संतोष सिंह रावत यांच्यासाठी आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे बल्लारपूर मतदारसंघावर महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) गटाने दावा केला आहे. जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे इच्छुक आहेत. त्यांनी कामदेखील सुरू केले आहे. बल्लारपूर मतदारसंघातून काँग्रेस सातत्याने पराभूत होत आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) कंबर कसली आहे. या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी राष्ट्रवादीला ही जागा सोडावी, अशी मागणी केली आहे. इतकेच नाही, ही जागा काँग्रेसला सोडल्यास जिल्हाध्यक्षासह सर्व पदाधिकारी राजीनामे देतील, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत संघर्ष होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ही जागा आता कुणाच्या वाट्याला जाणार, याची उत्सुकता राजकीय क्षेत्रात दिसून येत आहे.