Wednesday, November 13, 2024
HomeUncategorizedविद्यमान कायम; इच्छुक वाढले, संधी कोणाला? चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांतील चित्र

विद्यमान कायम; इच्छुक वाढले, संधी कोणाला? चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांतील चित्र

चंद्रपूर : सतीश आकुलवार, मुख्य संपादक

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतील लढतींचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. विद्यमान आमदारांची उमेदवारी कायम राहणार असली तरी इच्छुकांची संख्या वाढल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांच्या डोकेदुखीत भर पडली आहे.

विद्यमान आमदारांच्या विरोधात निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, त्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? याबाबतची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.

चंद्रपूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ सोडायला महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष तयार नाही. महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार, हे स्पष्ट आहे. येथील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्यासाठी भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांची द्वारे जवळपास बंद झाली आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात आहेत. सध्या भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे जोरगेवार यांच्या तुल्यबळ उमेदवार नसला तरी इच्छुकही कमी नाहीत.

बल्लारपूर या सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी थेट लढत होणार आहे. मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांचे नाव आघाडीवर आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी तयारी सुरू केली होती, मात्र त्यांचे नाव आता मागे पडले आहे.

राजुरा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे विरुद्ध शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप, अशी लढत होणार हे स्पष्ट आहे. येथे भाजपकडून देवराव भोंगळे, माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर उमेदवारीसाठी प्रयत्नरत आहेत. आदिवासी समाजाचा येथे स्वतंत्र उमेदवार असणार आहे.

ब्रह्मपुरीत विरोधी पक्षनेेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजपकडे तुल्यबळ उमेदवार नाही. माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांचे नाव चर्चेत असले तरी शांत व मवाळ स्वभावाचे प्रा. देशकर यांचा वडेट्टीवार यांच्यासमोर टीकाव लागणार नाही. त्यामुळे भाजप येथे कुणबी समाजाचा उमेदवार देण्याचा विचार करीत आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर त्यांचे बंधू प्रवीण काकडे यांचे नाव वरोरा मतदारसंघासाठी समोर करीत आहेत. मात्र काकडे यांच्या नावाला काँग्रेसमध्येच तीव्र विरोध आहे. काँग्रेसकडून डॉ. चेतन खुटेमाटे, कृऊबासचे माजी सभापती दिनेश चोखारे, प्रा. विजय बदखल, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सुनिता लोढीया, ॲड. पुरुषोत्तम सातपुते, डॉ. विजय व डॉ. आसावरी देवतळे यांना उमेदवारी हवी आहे. भाजपकडून माजी मंत्री संजय देवतळे यांचे सुपूत्र करण देवतळे यांचे नाव चर्चेत आहे.

चिमूर मतदारसंघात भाजपचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या विरोधात काँग्रेस तिसऱ्यांदा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ. सतिश वारजूकर यांना उमेदवारी देवून जुगार खेळणार, की नव्या दमाचा उमेदवार देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!