मुंबई : सतीश आकुलवार, मुख्य संपादक
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागली आहे. भाजपने ९९ उमेदवारांची घोषणा करुन सरशी घेतली असतानाच मविआमधील जागावाटप अद्याप पूर्ण झालेले नाही.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मविआमध्ये १७ जागांवर तिढा असल्याची माहिती दिली. विदर्भातील पाच ते सहा जागांवर वाद असल्याचेही त्यांनी सांगितले. जागावाटपावर आज शिक्कामोर्तब होईल, हेही सांगायला ते विसरले नाहीत.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले ?
जागावाटपाची चर्चा संपल्यात जमा आहे. 15-16 जागांची चर्चा बाकी आहे. 7-8 जागा आमच्यात बदलायच्या ठरवलं आहे. उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या जागांचा तिढा सुटलेला असेल. उद्या संध्याकाळी आम्ही जागा जाहीर करु, असे वडेट्टीवार म्हणाले.
17 जागांचा तिढा
काही प्रमाणात थोडीफार नाराजी असतेच.त्यांची आम्ही समज घालू आणि आघाडी म्हणून एकत्र लढू. तिन्ही पक्षांचा 17 जागांचा तिढा आहे. तो उद्या रात्री पर्यंत सुटेल. काल आम्ही हायकमांड सोबत चर्चा करून माहिती दिली. मार्ग कसा काढायचा यावर देखील त्यांच्याशी आम्ही बोललो. 90 जागा घेऊन आम्ही आज CEC मधे जात आहोत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
5-6 जागांवर वाद –
आज रात्री किंवा उद्या सकाळी आमची यादी येईल. विदर्भात 5-6 जागांवर आमचा वाद आहे, तो देखील सुटेल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
मातोश्रीवर तिढा सुटणार –
मुंबईतील तीन जागांचा तिढा आज मातोश्रीवर सुटण्याची शक्यता आहे. चेंबूर, शिवडी आणि भायखळा याचा तिढा आज सुटणार आहे. विद्यमान आमदार अजय चौधरी आमदार प्रकाश फातर्पेकर यांना देखील आज मातोश्रीवर बोलवण्यात आलं आहे. त्याच सोबतच भायखळा आणि शिवडी विधानसभेतील इच्छुकांना देखील मातोश्रीवर बोलवण्यात आलं आहे.
शिवडी विधानसभेतील इच्छुक सुधीर साळवी भायखळा विधानसभेतील इच्छुक किशोरी पेडणेकर, मनोज जामसूतकर, रमाकांत रहाटे यांना देखील मातोश्रीवर बोलवण्यात आलं आहे. आतापर्यंत सर्व विद्यमान आमदारांना तयारीला लागण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या त्यासंबंधित त्यांना मातोश्रीवर देखील बोलावण्यात आलं होतं. यामध्ये प्रकाश फातर्पेकर आणि अजय चौधरी यांना बोलवण्यात आलं नव्हतं.