गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी ह्या विधानसभा क्षेत्रावर काही अपवाद वगळता राजघराण्याचे वर्चस्व राहिले आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून राजनगरी अहेरी राहिली आहे.यावेळी विधानसभा निवडणुकीत वडील आणि मुलगी आमने-सामने उभे ठाकणार आहे.त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष या अहेरी विधानसभेकडे लागले आहे.
अहेरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा तर्फे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी घोषित झाली होती.आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा तर्फे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांना विधानसभेसाठी उमेदवारी घोषित झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात वडील विरुद्ध मुलीमध्ये लढाई रंगणार आहे. भाऊ-भाऊ, काका-पुतण्या, मुलगा-वडील, भाऊ-बहीण असा नात्यांमधला राजकीय संघर्ष महाराष्ट्रासाठी नवा नाही. याआधी अशा अनेक राजकीय लढाया झाल्या आहेत. ही राजकीय लढाई असेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यामधली. कारण, धर्मरावबाबांच्या कन्येनं बंड केलं असून सप्टेंबर महिन्यात अहेरीत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,माजी गृहमंत्री अनिल देशमुख व ईतर नेत्यांच्या उपस्थिती मध्ये तुतारी हाती घेतली होती.त्यामुळे अहेरीच्या राजघराण्यात बाप-लेक-पुतण्या असा त्रिकोणी राजकीय संघर्ष बघायला मिळणार आहे. त्यासोबत च काँग्रेसच्या दाव्याने चौरंगी लढतीची शक्यता आहे. त्यासोबतच महाविकास आघाडीकडून भाग्यश्री आत्राम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये असंतोष बघायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे हनमंतू मडावी यांच्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे जागा वाटपाच्या बैठकीत वडेट्टीवार यांनी अहेरीची जागा आम्ही लढवणारच यावर ठाम होते. गुरुवारी दिवसभर काँग्रेसच्या गोटात घडलेल्या घडामोडीनंतर हणमंतू मडावी देखील काँग्रेसकडून नामांकन दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१९ मध्ये देखील काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले. धर्मराव बाबा आत्राम,भाग्यश्री आत्राम,अंबरीश राव आत्राम,हनमंतू मडावी असा चौकोनी अहेरी विधानसभेत दिसण्याची शक्यता आहे.त्यामुळे महाविकास आघाडीत वाद पेटण्याची दाट चिन्हे आहेत.