गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
भारतीय जनता पक्षाने काल २२ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांचे तिकिट कापण्यात आले असून, डॉ.मिलिंद नरोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे डॉ.होळी हे बंडखोरी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
डॉ.मिलिंद नरोटे हे वैद्यकीय व्यावसायिक असून, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि अनुसूचित जमाती आघाडीचे जिल्हा प्रभारी आहेत. डॉ.नरोटे यांनी ‘स्पंदन’ फाउंडेशनच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनसंपर्क सुरु ठेवला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभाविपने लोकसभा निवडणुकीत डॉ.नरोटे यांना तिकिट देण्याची मागणी पक्षाकडे केली होती. परंतु त्यावेळी ते त्यांना देण्यात आले नाही. आता गडचिरोली मतदारसंघातून भाजपने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून आमदार डॉ.देवराव होळी, डॉ.मिलिंद नरोटे, डॉ.नामदेव उसेंडी व डॉ.चंदा कोडवते यांची नावे चर्चेत होती. भाजपमधील वेगवेगळ्या नेत्यांनी आपापल्या पसंतीच्या उमेदवारांची पक्षाकडे शिफारस केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवातीपासूनच डॉ.मिलिंद नरोटे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. मात्र, भाजपमधील काही नेते आणि रा.स्व.संघाचे काही स्वयंसेवकही आमदार डॉ.देवराव होळी यांच्या बाजूने होते. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे डॉ.नामदेव उसेंडी यांच्यासाठी चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी ताकद लावली होती. डॉ.उसेंडी यांचे नाव खूप चर्चेत होते. गंमत म्हणजे प्रदेश स्तरावरील काही नेत्यांनी स्पर्धेतील सर्वच उमेदवारांना ‘तुम्ही तयारी करा’, असे सांगितले होते. त्यामुळे मलाच तिकिट मिळेल, असे विश्वासाचे सूर प्रत्येक उमेदवाराच्या तोंडून निघत होते. परंतु आज पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने डॉ.मिलिंद नरोटे यांच्या नावाची घोषणा केल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
गुरुवारी २५ ऑक्टोबरला आ.डॉ.देवराव होळी यांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि पदाधिकारीसुद्धा होते. परंतु काल त्यांचे तिकिट कापण्यात आले आहे.
डॉ.होळी काँग्रेसच्या संपर्कात?
आज भाजपने तिकिट कापल्यानंतर डॉ.देवराव होळी हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या निकटस्थ कार्यकर्त्याने सांगितले. मात्र, काँग्रेसमध्ये आधीच मनोहर पोरेटी, विश्वजित कोवासे, डॉ.सोनल कोवे व वर्षा आत्राम या चार इच्छुकांमध्ये तिकिटासाठी स्पर्धा असल्याने काँग्रेस डॉ.होळींना संधी देते की अन्य कुणाला, हे यादी जाहीर झाल्यानंतरच कळेल. पण, डॉ.देवराव होळी हे महत्वाकांक्षी असल्याने ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढू शकतात, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.