गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
एकीकडे सर्वजण दिवाळीचा आनंद साजरा करीत असताना अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील एका युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. तेजस राजू बोम्मावार (वय २१), असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजू बोम्मावार याचे वांगेपल्ली येथे हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा तेजस हा पुण्यात एमबीएचे अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तो गावी आला होता. आज सकाळी तो काही मित्रांसह प्राणहिता नदीवर आंघोळीला गेला होता. परंतु आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर नागरिकांनी नदीकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक स्वप्नील इज्ज्पवार हेही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पोलिस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीने तेजसचा शोध घेतला. परंतु, दुपारपर्यंत त्याचा मृतदेह आढळून आला नाही. ऐन दिवाळीच्या दिवशी बोम्मावार कुटुंबीयांवर दु:खाचे डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.