चंद्रपूर : जिल्हा प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचे प्रचंड धावपळ. प्रचाराचा धुरळा. चाहत्यांचा गराडा. असं सगळं वातावरण असताना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना गहिवरून आलं. सण, उत्सव काहीही असो मुनगंटीवार सातत्याने आपल्या कामात व्यस्त असतात. त्यांचा जनसंपर्क कायम असतो. आलेल्या प्रत्येकाची त्यांच्याकडून आत्मियतेने विचारपूस केली जाते. प्रत्येकाबद्दल असलेल्या तळमळीच्या त्यांच्या याच स्वभावाची परतफेड आता लोक त्यांना प्रचारादरम्यान देत आहेत. असाच एक भावनिक प्रसंग नुकताच घडला.
दिवाळीच्या उत्सवात येणारा भाऊबीजेचा क्षण हा भाऊ बहिणींमधील नात्याच्या दृष्टीने फारच भावनिक असतो. यंदा दिवाळी आणि विधानसभा निवडणूक एकत्र आल्याने सध्या सर्वत्र प्रचार सुरू आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या मात्र प्रचार नसून जनसंपर्क सुरू आहे. लोकांच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रति लोक आता आपापल्या पद्धतीने भावना आणि आदर व्यक्त करीत आहेत.
ताई मी आता काय बोलू?
ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या भोवती चाहत्यांचा गराडा होता. या गरड्यातून वाट काढत एक महिला पुढे सरसावली. या महिलेच्या हातात एक थाळी होती. थाळीमध्ये असलेल्या दिव्यातील ज्योती ना.मुनगंटीवार यांची प्रतीक्षा करीत होती. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून मुनगंटीवार यांचे लक्ष या महिलेकडे गेले. क्षणाचाही विलंब न लावता ते देखील पुढे सरसावले आणि तो भावनिक क्षण जुळून आला.
इटोली गावातील मायाबाई चरणदास पिपरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांना औक्षण केले. भाऊबीजेच्या शुभ पर्वावर या एका गरीब बहिणी कडून तुम्हाला शुभेच्छा, असे शब्द मायाताईंच्या तोंडून बाहेर पडले. हे बोलत असताना त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या भावना आणि बहिणीचे प्रेम त्यांच्या डोळ्याच्या पाणावलेल्या कडा स्पष्टपणे सांगत होत्या. गावातील बहिणीचा हे प्रेम पाहून सुधीर मुनगंटीवार हे देखील गहिवरले. अत्यंत नम्रतेने दोन्ही हात जोडत त्यांनी आपल्या या बहिणीचं औक्षण स्वीकारलं. ताई मी आता काय बोलू? अशा भावना सुधीर मुनगंटीवार यांच्या मनात दाटून आल्या.
असेच अनेक भावनिक प्रसंग सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क दौऱ्यादरम्यान दिसून येत आहे. आपली राजकीय कारकीर्द सुरू झाल्यापासून मुनगंटीवार हे जनतेची सेवा ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य मानतात. आपल्यावर जनसेवेची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे जातपात, धर्म, पंथ याच्या पलीकडे जात आपल्याला काम करायचं आहे, असच ते नेहमी सांगत असतात. सुधीर मुनगंटीवार यांच्या बाबतीत ‘दिला शब्द केला पूर्ण’ असं ठामपणे सांगण्यात येतं. त्यामुळे लोकांच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या मुनगंटीवार यांना अशा अनेक बहिणी औक्षण करीत आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे थरथरणारे अनेक हात त्यांना आशीर्वाद देण्यासाठी सरसावत आहेत.
आजपर्यंत अनेकांच्या मदतीसाठी मुनगंटीवार धावून गेले. आपण किती लोकांना मदत केली याचा हिशोब त्यांनी कधी ठेवला नाही. सत्कर्म करत रहा या श्रीकृष्णाच्या उपदेशाप्रमाणे ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. अशातच अनेक गावांमध्ये गर्दीतून अचानक पणे कोणीतरी समोर येतो आणि म्हणतो भाऊ आज जे आमचं चांगलं होत आहे ते तुमच्यामुळेच आहे. तुम्ही त्यावेळेला मदत केली नसती तर.. असे अनेक प्रसंग सध्या मुनगंटीवार यांच्यासोबत असलेल्या सर्वांनाच अनुभवायला येत आहे. यावर मुनगंटीवार अत्यंत नम्रपणे एकच उत्तर देतात मी फक्त माझं कर्तव्य करीत आहे. माझी जबाबदारी पार पाडत आहे.