मुंबई : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
राज्यातील महायुती सरकारचा सत्ता वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. रात्री उशिरा दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात बैठक पार पडली.
या बैठकीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून खाते वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात भाजपचा वरचष्मा असणार आहे. महायुतीतील इतर घटक पक्षांकडे सरकारमधील अतिशय महत्त्वाची खाती नसणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र, महायुती सरकारचा जवळपास 13 दिवसांनी शपथविधी झाला. या शपथविधी सोहळ्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार या तिघांनीच शपथ घेतली. अद्यापही खाते वाटप झाले नाही. महायुतीमधील खाते वाटपावर दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात महायुतीमध्ये खाते वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
भाजपचा अजित पवारांना धक्का?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वरचष्मा राहणार आहे. कॅबिनेटमध्ये क्रमांक एकची समजली जाणारी सर्व खाती भाजपकडे राहणार आहे. त्यानुसार, गृह आणि अर्थ खाते हे भाजपकडे राहणार आहे. नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीच्या पदरात महसूल खातं पडण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खातेही सोडण्याची भाजपची तयारी आहे. या फॉर्म्युल्यावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत अंतिम चर्चा झाल्यावर अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोणाला किती मंत्रिपदे?
महायुती सरकारमध्ये भाजपला 20 खाती मिळतील. तर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी 10 खाती मिळतील. राष्ट्रवादीने आपल्याला शिवसेना इतकीच खाती मिळावीत असा आग्रह धरला होता. त्याशिवाय, अजित पवारांना अर्थ मंत्रीपद मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.