गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षल्यांनी जंगलात पुरुन ठेवलेली स्फोटके शोधून काढण्यात पोलिसांना आज यश आलं आहे. अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलिस मदत केंद्रांतर्गत करंचा गावानजीकच्या जंगलातून ही स्फोटके शिताफीने बाहेर काढून नष्ट करण्यात आली.
करंचा जंगलात नक्षल्यांनी एका प्लॉस्टिक ड्रममध्ये स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर जिमलगट्टाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत दसूरकर यांच्या नेतृत्वात मरपल्ली पोलिस मदत केंद्रातील पोलिस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी आज त्या परिसरात शोध मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांना ड्रममध्ये स्फोटके आढळून आली. त्यात दोन किलो आयईडी स्फोटके, तीन वायर बंडल, एक बॅटरी, एक डिटोनेटर इत्यादी साहित्य होते. पोलिसांनी अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील बॉम्ब शोधक पथकास पाचारण करुन त्यांच्या मदतीने स्फोटके नष्ट केली.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक एम.रमेश, अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बंडू आत्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.