नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
उपराजधानीत गेल्या चार दिवसांपासून दररोज एक खून शहरात सुरू असल्याने पोलिसांचा वचक संपला की काय असे चित्र निर्माण झाले आहे. रविवारी जरीपटक्यातील ख्रिश्चन कब्रस्थानातील रमेश शेंडे नामक चौकीदाराची निर्घृण हत्या करण्यात आली.
यापूर्वी अजनी, कळमना, यशोधरानगर आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या घटना घडल्या.
मध्यरात्रीच्या सुमारास धंतोली परिसरात तिघांनी एकाचा चाकूने भोसकून खून करुन रस्त्यावर फेकून पळ काढला. आठवड्याच्या सुरवातीलाच अजनीत बापलेक हत्येची घटना घडली. त्यानंतर शुक्रवारी कुलदीप चव्हाण नावाच्या युवकाचा मित्रानेच खून केला.दोन दिवसांपूर्वी यशोधरानगरमध्ये वहिणीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राचाही राजा नामक युवकाने खून केल्याची घटना समोर आली.
सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात या सलग चार खुनांनी उपराजधानी हादरली आहे. गेल्या चार दिवसांत शहरात घडलेले चवथे तर आठवड्यातील पाचवे हत्याकांड आहे. रविवार, २९ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक युवक हातात चाकू घेऊन जरीपटक्यातील भारतीय प्रोटेस्टंट ख्रिचन कब्रस्थान येथे आला. तो सरळ चौकीदार रमेश शेंडे याच्या दिशेने चालत गेला. शेंडे यांचा हात पकडून काहीतरी विचारणा केली. त्यानंतर चाकूने रमेश यांच्यावर सपासप वार केले. त्याचवेळी कब्रस्थानात अंत्यविधीसाठी आलेला युवक जेकब किरण यांनी धावत जाऊन त्या युवकाला पकडले. तोपर्यंत रमेश शेंडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
काही नागरिकांनी रमेश यांना रुग्णालयात पोहोचवले तर आरोपीला किरण यांनी पकडून ठेवले. आरोपी पळून जाण्यासाठी झटापट करीत असतानाच किरण यांनी जरीपटका पोलिसांना फोन केला. हत्याकांडाबाबत माहिती दिली. काही वेळातच जरिपटका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सिंग तेथे पोहोचले. आरोपीला ताब्यात घेतले आणि घटनास्थळ पंचनामा करुन हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.