गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
जिल्ह्याच्या उत्तर भागात छत्तीसगड राज्यातून हजारो गोवंशाची तस्करी रात्रीच्या सुमारास गडचिरोली- नागपूर व्हाया तेलंगणा राज्यात केली जाते.
तालुक्यातून दर आठवड्यातून २० ते २५ ट्रक गोवंश भरून नागपूर, हैदराबाद येथे पाठविले जातात. एवढे नाके व पोलिस चौकी ओलांडून वाहने जातातच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तालुक्याच्या कोटरा परिसरातील खिरुटोला जंगलात चारा-पाणी न देता निर्दयतेने बांधून ठेवलेल्या ११६ गोवंशाची सुटका कोरचीचे पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी केली होती. या कारवाईनंतर सुद्धा नागपूरचे तस्कर पोलिसांना न जुमानता गोवंशाची तस्करी बिनधास्त करीत आहेत. कोरची, कोटगूल, ग्यारापत्ती, बेडगाव, पुराडा, कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, आष्टी आदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तेलंगणा, हैदराबाद, नागपूरला गोवंशाची तस्करी केली जाते. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.
३० वर्षांपासून तस्करी फोफावली
कोरची तालुका हा नागपूरच्या गोवंश तस्करांचे माहेरघर बनलेला आहे. यामुळे नागपूरचे मोठे तस्कर कोरचीतील पाच ते सहा खेड्यांलगत असलेल्या जंगलात ठिय्या मांडून त्या ठिकाणी गोवंश साठवून तस्करी करतात. मागील ३० वर्षांपासून रात्री तस्करी केली जात आहे.
तस्कर पुढे ट्रक मागे
गोवंशाची कत्तलखान्यात वाहतूक करण्यापूर्वी अनेक पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून तस्कर स्वतः आपल्या चारचाकी वाहनाने रस्त्यात पुढे असतात. रस्त्यात पोलिस नाकेबंदीत आढळले तर मार्ग बदलतात.
‘ही’ गावे आहेत तस्करीचे केंद्र
छत्तीसगड राज्यातील अनेक गावांतून नागपूरचे तस्कर काही गोवंश खरेदी करतात. काही गोवंशाची चोरीने खरेदी करून जंगल मार्गाने मजुरांमार्फत पायदळ सीमा ओलांडून कोरची तालुक्यातील बोटेकसा, कोटरा, हितापाडी, बोरी, कोसमी नं. २ या गावांच्या जंगल परिसरातून ट्रकमध्ये कोंबून कत्तलखान्यात नेतात.