चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर जिल्ह्यात वाळूची तस्करी करणाऱ्यांची दादागिरी सतत वाढत आहे. काल गुरुवारी जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात एका वाळू तस्कराने चक्क तलाठ्याला धक्काबुक्की करत रेतीने भरलेला ट्रॅक्टर पळवून नेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या बाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम वाळूची तस्करी सुरू आहे. वारंवार सुरू असलेल्या वाळूच्या चोरीमुळे तस्करांचा मुजोरपणा सतत वाढत आहे. याचा प्रत्यय आज पुन्हा भद्रावती तालुक्यातील कारेगावी आला आहे.
काल गुरुवारी भद्रावती तालुक्यातील कारेगाव येथे रेतीचे अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तलाठी गीते यांना मिळाली. त्यांनी कारेगाव येथे जाऊन अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडविले. तलाठी कारवाई करत असतानाच चक्क तलाठ्याला धक्का देत ट्रॅक्टर चालकांनी त्याच्या समोरून पळवित नेला. यावेळी अनेक नागरिक जमलेले होते. सदर प्रकाराचा व्हिडिओ काही नागरिकांनी घेऊन सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सदर घटनेची माहिती भद्रावतीच्या तहसीलदार भांडारकर यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार शेगाव पोलिसात सदर प्रकाराची तक्रार करण्यात आली आहे.