चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर शहराला तलगतच्या ताडाळी येथील धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. कंपनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या आरोपावरून कामगार संतप्त झाले. करण शेरखे ( वय 35) रा. लालपेट कॉलरी असे मृतक कामगाराचे नाव आहे. ही घटना काल दुपारी दीड वाजताचे सुमारास घडली. सदर मृतक हा कन्वेअर बेल्ट ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.
चंद्रपूर सेंट्रल एमआयडीसी ताडाळी मध्ये धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये पावर प्लांट आहे. काल दुपारी दीड वाजताच्या सुमारास सदर कामगार काम करीत असताना कन्वेअर बेल्ट मध्ये फसला. पाहता पाहता तो मशीनच्या आत मध्ये गेला त्यामुळे त्याच्या जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती कामगारांना मिळताच कामगार गोळा झाले. यावेळी कामगार संघटना एकत्रित झाल्या. वारंवार मागणी करूनही कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोप करून कामगार संतप्त झाले. कंपनीच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करून आक्रोश निर्माण झाला. व्यवस्थापनाने पोलीस प्रशासन व दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले. सर्व कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर तळ ठोकून ऊभे होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि मृतक कुटुंबीयांच्या नातेवाईकांना भरघोस मदत देण्याची मागणी लावून धरण्यात आली होती.