चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
ताडाळी एमआयडीसी येथील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीमध्ये काल १२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.१५ वाजता कर्णधर अशोक शेरके या कामगाराचा कोल हँडलिंग प्लांटमध्ये मृत्यू झाला.
या कामगाराच्या कुटूंबियांना कुठलाही मोबदला न देता कंपनी व्यवस्थापनाचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न कामगारांनी हाणून पाळला. त्यानंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी घटनास्थळ गाठत या कामगाराच्या कुटुंबीयांना ७० लाख रुपयांची आर्थिक मदत व इतर लाभ मिळवून दिल्याने कामगारांचा रोष शांत झाला.
चंद्रपूर शहरातील भिवापूर वॉर्ड येथील रहिवासी कर्णधर अशोक शेरके (वय ३६) या फील्ड ऑपरेटरचा धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीमध्ये कोल हँडलिंग प्लांटमध्ये रिफ्लेक्टर जॅकेट अडकल्याने अपघात झाला. संपूर्ण बॉडी पुलीमध्ये फसली. त्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर छिन्न विछिन्न झाले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. कंपनी व्यवस्थापनाने मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थापनाचा हा प्रयत्न उपस्थित कामगारांनी हाणून पाडत रुग्णवाहिका अडवून आपल्या ताब्यात घेतली. जोपर्यंत मृत कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व इतर लाभ देत नाही, तोपर्यंत सर्व कामगारांनी कंपनी कार्यालयासमोर ठिय्या मांडत काम बंद आंदोलन केले.
आमदार सुधाकर अडबाले यांनी रात्री ८.३० वाजता थेट कंपनीतील घटनास्थळ गाठले. घटनास्थळाची पाहणी करत संपूर्ण घटनाक्रम कामगारांकडून जाणून घेतला. त्यानंतर कामगारांशी चर्चा करून कंपनी व्यवस्थापनाची बैठक घेतली. कंपनी व्यवस्थापनाकडून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना तात्काळ नुकसान भरपाई, नोकरी व इतर लाभ देण्याबाबत मागणी लावून धरली. कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करण्याच्या भूमिकेत बघता आमदार अडबाले यांनी त्यांचा “क्लास” घेत तात्काळ ॲग्रीमेंट करून नुकसान भरपाई द्या, अन्यथा रात्र इथेच काढेन, अशी तंबी दिली. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने ७० लाख रुपये देण्याचे मान्य केले.
मृत कामगाराच्या कुटुंबीयांना ७० लाख रुपये व इतर देय लाभ, कामगाराच्या पत्नीस धारिवाल कंपनीत शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी, आंदोलन करणाऱ्या कामगारांवर कोणतीही कारवाई करणार नाही, कंत्राटी कंपनीकडून मिळणारे इतर लाभ व अंत्यसंस्कारासाठी रोख पाच लाख रुपये मदत आमदार सुधाकर अडबाले यांनी रात्री ११ वाजता मिळवून दिली. त्याबाबतचे कंपनी व्यवस्थापनाकडून ॲग्रीमेंट लिहून घेतले.
या कंपनीत झालेल्या अपघातास कंपनी व्यवस्थापनातील अधिकारी सर्वस्वी जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात येईल, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी कामगारांना सांगितले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी यादव, तहसीलदार पवार, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, सोहेल रजा, प्रशांत भारती, सचिन कत्याल, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे महानगर अध्यक्ष दिगांबर कुरेकार, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.