नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
नागपुरात दोन गटात झालेल्या तणावापूर्ण परिस्थितीमुळे जमावाकडून एकमेंकावर दगडफेक करण्यात आली. त्यांनतर काही ठिकाणी जमावाकडून जाळफोळ करण्यात आली. ही तणावपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागपूरचे पोलिस उपायुक्त निकेतन कदम घटनास्थळी गेले असता त्यांच्यावर जमावाने धारदार शस्राने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाल गांधी गेट परिसरातील एका धार्मिक स्थळाची चादर, ध्वज जाळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोन गटात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी जमावाकडून एकमेंकांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी शहरातील अनेक ठिकाणी जाळफोळीच्या घटनाही घडल्या. ही तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधूर सोडण्यात आले. तर काही ठिकाणी जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी जमावाने पोलिसांवरही हल्ले करण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत ५० हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले.दगडफेक व जाळफोळ करणाऱ्या जमावाकडे धारदार शस्रेही होती. यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने नागपूरचे पोलिस उपायुक्त निकेतन कदम घटनास्थळी गेले होते. यावेळी जमावाने त्यांच्यावरही धारदार शस्राने हल्ला केला. यामध्ये हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर जमावातील २५ ते ३० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.